महापालिका रुग्णालयांत सुविधांची वानवा  

आरोग्य सेवेसाठी महापालिकेचा भार मुंबईवर

शहराची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी निवडणूक जिंकल्यानंतर सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय सुरू करू, असे आश्वासन गेल्या पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांच्या वतीने देण्यात आले होते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय सोडा, उलट अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांची अवस्था सुधारण्याची तसदीही पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये आरोग्य सेवेच्या दुरवस्थेच्या विषयावर मतदारांकडून प्राधान्याने विचारले जात आहे.

कल्याणमधील रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर ही दोन महापालिका रुग्णालये असून पुरेशी डॉक्टरांची संख्या नसल्याने ही रुग्णालये केवळ बाह्य रुग्ण तपासणी करून सोडून देत असतात. एखादा गंभीर अपघातातील रुग्ण रुग्णालयात आल्यास त्याला अद्ययावत उपचार करण्याची व्यवस्थाच महापालिकेकडे नसल्याने या रुग्णांना ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयांत हलवले जाते. महापालिका रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी महापालिकेने तसे प्रस्ताव बनवून राज्य शासनाकडे पाठवले असून त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. दोन्ही महापालिका रुग्णालयांत ९० अत्यावश्यक पदांना भरती करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे असून रुग्णालयाला कर्मचाऱ्यांची मंजुरी मिळाली असतानाही कर्मचारी अपुऱ्या अवस्थेत आहेत. दोन्ही रुग्णालयांत १२० खाटा असून, ३० खाटांची चार लहान रुग्णालये आहेत. याशिवाय १३ नागरी आरोग्य केंद्रांतून रुग्णालयीन सेवेकरिता कर्मचारी काम करतात. ही व्यवस्था पुरेशी सक्षम करण्यासाठी ९० कर्मचाऱ्यांना भरती करून कर्मचारी संख्येत वाढ करावी, असा प्रस्ताव महापालिकेने सरकारकडे पाठवला होता. या कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी उचलण्याचे कबूल केले होते. दोन वर्षांहून अधिक काळ हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पडून होता. याविषयी शासनाकडे पाठपुराव केल्यानंतरही कर्मचाऱ्यांची संख्या वाढू शकलेली नाही.

रुक्मिणीबाई रुग्णालय

’कल्याण शहरातील रुक्मिणीबाई रुग्णालयात कल्याणपासून कर्जत, खोपोली व कसारापर्यंतचे रुग्ण दाखल होत असतात.

’डॉक्टर आणि तज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे या रुग्णालयाची आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे.

’कल्याण आणि त्यापुढील रेल्वे स्थानकांमध्ये होणाऱ्या अपघातग्रस्तांना या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात येते, मात्र पुरेशा उपचाराअभावी त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवावे लागते.

’रेडिओलॉजिस्ट नसल्याने रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद आहे, तर भूलतज्ज्ञांच्या कमतरतेमुळे शस्त्रक्रिया विभागही ठप्प पडला आहे.

’रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा वापर कर्मचाऱ्यांअभावी बंद आहे. बालरोगतज्ज्ञ तसेच नर्सच्या कमतरतेमुळे बालरोग विभागही ठप्प होण्याची परिस्थिती आहे.

शास्त्रीनगर रुग्णालय

’डोंबिवली शहरातील हे रुग्णालय सध्या केवळ प्रथमोपचार केंद्र बनले आहे. पुरेशा साहित्याविना शस्त्रक्रिया थांबल्या आहेत, तर यंत्रांची देखभाल व दुरुस्ती नसल्याने अनेक विभाग बंद आहेत.

’डोंबिवलीच्या नागरिकांना सुविधा देणाऱ्या महापालिकेच्या सुमारे १२० खाटांच्या रुग्णालयाची इमारत भव्य असली तरी त्यातील यंत्रणा मात्र सुस्त आहेत.

’केवळ प्रसूती विभाग,  मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि बाह्य उपचार केंद्र वगळता या रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे उपचार रुग्णांवर होत नाहीत.

’रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ नाहीत, यंत्रणांच्या ठिकाणी आवश्यक तज्ज्ञ नाहीत. उच्च रक्तदाब यंत्रे, पल्स तपासणी मीटर, ईसीजी यंत्रणा यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने ते बंद स्थितीत असतात.

’रुग्णालयातील केवळ तीन विभाग सुरू असून त्यामध्ये बाह्य उपचार केंद्र, महिला विभाग आणि पुरुष विभाग यांचा समावेश आहे.