बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या संख्येत भर पडावी यासाठी उद्यानात दोन वाघिणींना विदर्भातून आणण्यात आले आहे. नव्या वाघिणी उद्यानात आल्याच्या निमित्ताने येथील वाघांचे संगोपन कसे केले जाते? येथील सिंह, बिबटय़ा आदी प्राण्यांची काय परिस्थिती आहे? जंगली प्राणी सामावून घेण्याची या उद्यानाची क्षमता आणि या जंगली पशूंशी निगडित विविध समस्यांसदर्भात ‘लोकसत्ता मुंबई’ने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्याशी केलेली ही खास बातची

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. शैलेश पेठे,
पशू वैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

* उद्यानात वाघिणी आणण्याचे नेमके कारण काय?
उद्यानात या ११ जुलैला २ वाघिणी पेंच येथील अभयारण्यातून आणण्यात आल्या. आठ वर्षांपूर्वी या वाघिणी बछडे असताना त्यांच्या मातेचा मृत्यू झाल्याने अनाथ झाल्या होत्या. त्यांना त्या वेळी जंगलात सोडता येईल का याबद्दल प्रयत्न वन विभागाने तेव्हा केले होते. त्याकरिता त्यांचे संगोपन पूर्णत: अज्ञातवासात करण्यात आले. पुढे जाऊन या वाघिणींना जंगलात जाऊन सोडण्यात आले. मात्र, २ आठवडे जंगलात राहूनदेखील वाघिणींनी कोणतीही शिकार केली नाही. त्यामुळे त्यांना परत ३ हेक्टरच्या बंदिस्त कुंपणात घेण्यात आले. यापुढे, त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचा प्रयत्न करावा किंवा एखाद्या सफारीत सोडावे याबाबत निर्णय घेण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले. या समितीत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व वन्य प्राण्यांचे तज्ज्ञ, सामाजिक संस्था आदींचा समावेश होता. समितीने दिलेल्या शिफारशीनुसार वाघिणींना सफारीत सोडणेच योग्य आहे, असा निर्णय झाला. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे मत घेऊन या दोन वाघिणींना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हस्तांतरित करण्याचा आदेश मुख्य वाइल्ड वॉर्डन यांनी दिला.
* वाघिणींचा खर्च व संगोपन कसे करणार आहात?
या खर्चाचे नियोजन उद्यान व्यवस्थापनाने केले आहे. वाघिणींना दिवसाला म्हशींचे ९ किलो मांस देण्यात येते. त्यामुळे एका वाघिणीवर दिवसाला तीन हजारांपर्यंत खर्च होतो. तसेच, या वाघिणी खूप दुरून आल्याने त्यांना इथल्या वातावरणात सामावून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांना माणसांची सवय व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यांना ३ महिने आम्ही निरीक्षणाखाली ठेवणार आहोत. तसेच, यानंतर त्यांना व्याघ्र सफारीत ठेवण्यात येणार आहे. येथील सहा वाघ आधीचेच असून तेही एकाच कुटुंबातील आहेत. या दोन वेगळ्या कुटुंबांतील वाघांची एकमेकांना सवय होण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. यानंतरच त्यांना पर्यटकांपुढे आणता येऊ शकेल. म्हणून सध्याचा काळ त्यांच्यासाठी व आमच्यासाठी महत्त्वाचा काळ आहे. मात्र, पर्यटकांना या वाघिणींना पाहून निश्चितच आनंद मिळेल.
* उद्यानात सिंहांचीही कमतरता आहे, असे वाटत नाही का?
होय, उद्यानात सध्या अजून सिंह ठेवता येऊ शकतील. सध्या येथील सिंह सफारीत ३ सिंह असून त्यातील एक मादी असून उरलेले दोन नर आहेत. यातील एक सिंह १४ वर्षांचा असून उर्वरित दोन ४ वर्षांचे आहेत. हे प्राणी सामान्यत: १६ वर्षेच आयुष्य जगतात. त्यामुळे, उद्यानात सिंहांची आवश्यकता निश्चितच आहे. तसेच, या सिंह सफारीची क्षमता पाहता येथे अजून ३ सिंह वास्तव्य करू शकतात. म्हणून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह देण्यात यावेत, अशी मागणी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. देशात जिथे क्षमतेपेक्षा जास्त सिंह आहेत,
तेथून नजीकच्या काळात मुंबईत सिंहही येऊ शकतात.
* उद्यानात १७ बिबटय़ांना जेरबंद करून त्यांच्यावर अन्याय केला असे वाटत नाही का?
गेल्या २ वर्षांत एकही बिबटय़ा पकडण्यात आलेला नाही. पाच वर्षांपूर्वी बिबटय़ा दिसला, की पकडण्यात येत होता. एखादा जंगली प्राणी कोणत्याही कारणामुळे ३ महिने बंदिस्त राहिला की त्याला केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या नियमांप्रमाणे जंगलात सोडता येत नाही. मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘मुंबई फॉर एसजीएनपी’ व राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी उद्यानाच्या चहूबाजूंनी असलेल्या वस्ती व शाळांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली. या अनुषंगाने नागरिकांमध्ये सांगण्यात आले की, बिबटे हे आपले मित्रच आहेत. बिबटय़ा दिसल्यावर जास्त गोंधळ घातल्यावर ते रौद्र रूप धारण करतात. त्यातून प्राणी-मनुष्य संघर्ष निर्माण होतो. अशा वेळी बिबटय़ा दिसल्यावर तो परत जंगलात जाण्याकरिता अनुकूल परिस्थिती आपल्यालाच निर्माण करणे आवश्यक आहे. हे टाळण्यासाठी ही जनजागृती चालू असून याला आत्ता यश आल्याचे दिसते. याकरिता आम्ही एक पुस्तिका छापली असून यावर आम्ही एक शॉर्टफिल्मही प्रसिद्ध केली आहे.
* उद्यानातील पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नेहमी टीका का होते?
उद्यानातील पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणारी टीका ही अज्ञानातून व खरी परिस्थिती माहीत नसल्याने होते. पशू वैद्यकीय अधिकारी व माणसांचे डॉक्टर यांच्या कार्यशैलीत फरक आहे. एखादा माणूस आजारी पडला की तो डॉक्टरांना स्वत:बद्दल सगळी माहिती व त्याने आजारी पडण्याआधी काय-काय केले हे सर्व सांगतो. पशू वैद्यकीय अधिकाऱ्यासमोरील जखमी वा आजारी जंगली प्राणी याने यापूर्वी काय खाल्ले, तो का आजारी पडला हे आम्हाला माहीत नसते. तसेच, आजारी वा जखमी असताना तो हल्ला करण्याच्या मन:स्थितीतच असतो आणि चिडलेला असतो. यातून आमच्याच जिवाला धोका अधिक असतो. त्यामुळे, त्याला सर्वप्रथम बेशुद्ध करणे हे आमचे काम असते; पण त्याला बेशुद्ध केल्यानंतरही त्या औषधाच्या मात्रेने कदाचित मृत्यू येऊ शकतो, कारण तो आजारी का पडला याचे ठोस कारण आम्हाला माहीत नसून त्या परिस्थितीत त्याच्यावर उपचार करण्याचाच आमचा प्रयत्न असतो, कारण तो इतरांवर हल्ला करू शकतो. मात्र, उपचारादरम्यान प्राणी दगावतात व नागरिक पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांवर टीका करतात.
संकेत सबनीस