कल्याण : माझ्या मुलीची कुख्यात विशाल गवळीने ज्या पध्दतीने हत्या केली. त्याचीच शिक्षा त्याला परमेश्वराने दिली. जशी करणी, तशी भरणी हा भगवंताचा न्याय आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण पूर्वेतील मयत बालिकेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. शासन, पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल पीडितेच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले. आपणास सरकार, शासनाने केलेल्या प्रयत्नातून न्याय मिळाला, असे बालिकेच्या वडिलांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, कोळसेवाडी पोलीस, ठाणे, कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस यांनी या सगळ्या प्रकरणात मोलाचे सहकार्य केले. आपल्या मुलीच्या हत्येनंतर आरोपी विशाल गवळीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी या सर्व शासक, प्रशासकांनी खूप कणखर, महत्वाची भूमिका घेतली. आम्हा कुटुंबीयांना न्याय मिळेल यादृष्टीने त्यांनी कार्यवाही केली होती. त्यामुळे या सर्व शासक, प्रशासकांच्या कार्यवाही बद्दल मयत बालिकेच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले.
काहीही दोष नसताना आरोपी विशाल गवळीने आपल्या मुलीची हत्या केली. ज्या पध्दतीने त्याने हे कृत्य केले. त्याची शिक्षा त्याला भगवंतानेच अल्पावधीत दिली. भगवंत हे सगळे बघत असतो. त्यानेच अल्पावधीत विशाल गवळीचा न्याय केला, अशा कठोर शब्दात मयत बालिकेच्या वडिलांनी आपली भावना व्यक्त केली.
आपल्या कुटु्ंबीयांना विशाल गवळीच्या कुटुंबीयांकडून सर्वाधिक धोका आहे. आमच्या जीवाला काही करायचे असेल तर विशालचे वडील आणि त्याचे कुख्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे भाऊ काही करू शकतात. त्यांच्या भावांची या भागात खूप दहशत आहे. विविध प्रकारची शस्त्र, हत्यारे त्यांच्याकडे आहेत, अशी टिपणी बालिकेच्या वडिलांनी केली.
माझ्या मुलीसोबत जो प्रकार घडला, तसा प्रकार पुन्हा कोणा मुलीबाबत होऊ नये, हीच आपली मागणी शासनाकडे आहे. यासाठी विशालसारख्या गुन्हेगारांना कठोर शासन होणे गरजेचे होते. विशालला कोठर शिक्षा होण्यासाठी आम्ही न्यायिक मार्गाने शासन सहकार्याने लढत होतो. या प्रकरणात आम्हाला न्याय मिळणारच होता, पण तत्पपूर्वीच विशाल गवळीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा परमेश्वराने केलेला न्याय आहे, असे बालिकेच्या वडिलांनी सांगितले.कल्याण, डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला संघटनांनी घडल्या प्रकाराबद्दल समाधान व्यक्त केले आहे