अनेकदा मोठमोठे नेते रस्त्यावरील चहा टपरी अथवा वडापाव सेंटरवर थांबून पदार्थांचा आस्वाद घेतात. यानंतर संबंधित नेत्याची सर्वसामान्यांशी नाळ असल्याची चर्चाही होते. मात्र, ठाण्यात भाजपा नेत्यांचा असाच व्हिडीओ कौतुकाचा विषय होण्याऐवजी टीकेचा विषय ठरला. ठाणे स्टेशनबाहेरील गजानन वडापाव सेंटरमधील या व्हिडीओत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते वडापाववर ताव मारताना दिसत आहेत. मात्र, हे सर्व नेते आणि कार्यकर्ते तब्बल २०० वडापाव खाऊन पैसे न देताच निघून गेल्याचा आरोप झाला. यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हॉटेल मालकाला पैसे अदा करत या वादावर पडदा टाकला.
रावसाहेब दानवेंसह अनेक दिग्गज नेते या व्हिडीओत दिसत असल्याने वडापाव खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. त्यातच बिल न दिल्याचा आरोप झाल्याने विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना फुकट वडापाव खाणाऱ्यांची तुमचं शहर सांभाळण्याची औकात नाही, असं म्हणत भाजप मंत्र्यांवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
नेमकं काय झालं?
मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा मार्गावर पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते हजर होते. रेल्वे मार्गाच्या उद्घाटनानंतर या सर्व नेत्यांनी दिवा ते ठाणे असा लोकल रेल्वेने प्रवास केला. यानंतर या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाणे स्टेशनबाहेरील गजानन वडापाव सेंटरमध्ये वडापाव आणि भजांचा आस्वाद घेतला.
केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपा कार्यकर्त्यांनी गजानन वडापाव सेंटरमध्ये २०० वडापाव आणि अनेक प्लेट भजी खाल्ली. मात्र, शेवटी ते याचं बिल न देताच निघून गेले. त्यामुळे हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि काही वेळेतच हा विषय चर्चेचा विषय ठरला. याबाबत टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.
हेही वाचा : Video : …आणि नेहमीच्या गर्दीसोबत चक्क रेल्वेमंत्रीही लोकलमध्ये चढले! ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का!
माध्यमांनी हा विषय उचलल्यानंतर काही वेळातच स्थानिक भाजपा नेत्यांनी पुन्हा गजानन वडापाव सेंटर गाठत नाश्त्याचं बिल दिलं. तसेच हॉटेल मालकासोबत बिल दिले असल्याचं जाहीर करणारा व्हिडीओ देखील जारी केला. यामुळे या विषयवर पडदा टाकण्यात आला असला तरी सोशल मीडियावर या घटनाक्रमाची चांगलीच चर्चा रंगलीय.