उल्हासनगर हे सिंधीबहुल व्यापाऱ्यांचे शहर. भाजपमधील नेतृत्वाची धुरा लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होती तेव्हा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून हमखास भाजपला मताधिक्य मिळत असे. विधानसभा निवडणुकीत मात्र ही मते पप्पू कलानीकडे वळत असत. दहा वर्षांपूर्वी भाजपचे कुमार आयलानी यांनी कलानी कुटुंबाचा पराभव करत या शहराचे राजकीय वारे वळविले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही आयलानी यांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. यंदा या मतदारसंघात पुन्हा एकदा कुमार आयलानी विरुद्ध ज्योती कलानी असाच सामना रंगणार आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपच्या तंबूत दाखल झालेले कलानी कुटुंब उमेदवारी नाकारली गेल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीकडून िरगणात आहे. भाजप नगरसेवकांत झालेली फूट, रिपाइंच्या भगवान भालेराव यांची बंडखोरी आणि सिंधी-मराठी वाद तसेच देशातील मंदीचा येथील व्यापारावर दिसत असलेला परिणाम पाहता

ही निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे.  प्रत्येक निवडणुकीत भिन्न परिस्थिती असलेल्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात यंदाही कमालीचा गुंता झाला आहे. दोन वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीत भाजपने ओमी कलानी यांना जवळ करत शिवसेनेला दूर ठेवून महापौरपद काबीज केले होते.

ओमी कलानीला भाजपच्या उमेदवारीचे वेध लागले होते. असे असताना भाजपच्या नेतृत्वाने अखेरच्या क्षणी कुमार आयलानी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. त्यामुळे कलानी कुटुंब पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळले आहे. ज्योती कलानी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता यावी यासाठी धडपडणारे कलानी कुटुंब आता याच पक्षाच्या पराभवासाठी  रिंगणात आहे. गेल्या काही वर्षांत शहरात भाजपची ताकद मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. कलानी समर्थकांचा पाठिंबा घेऊ न भाजपने पालिका काबीज केली असली तरी कलानी समर्थक भाजपच्या चिन्हावर नगरसेवक झाले आहेत.

विद्यमान महापौर पंचम कलानी भाजपच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानींचा प्रचार करत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो स्थानकाला सिंधूनगर नाव देण्याची घोषणा दिल्याने शहरात पुन्हा सिंधी विरुद्ध मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंधी मतांना चुचकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असली तरी शहरातील व्यापाराला आलेली मरगळ यामुळे हा समाज भाजपवर नाराज आहे. त्याचा फटका भाजपच्या कुमार आयलानी यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. दुसरीकडे रिपाइंचे भगवान भालेराव निवडणूक रिंगणात उतरल्याने ते कुणाची मते घेतात यावरून निकालाची दिशा ठरेल असे असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघात खरी लढाई भाजपच्या कुमार आयलानी आणि ज्योती कलानी यांच्यातच होणार आहे. त्यामुळे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

येथील बहुतांश मतदार सिंधी भाषिक असले तरी गेल्या काही दिवसांत येथून सिंधी मतदारांनी स्थलांतरण केले आहे. मुस्लीम, शीख, ख्रि्रश्चन, राजस्थानी, अनुसूचित मतदारही या मतदारसंघात मोठय़ा संख्येने आहेत. हेच मतदार मोठय़ा प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडत असतात. त्यांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होणारा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. वरप, म्हारळ आणि कांबा या गावांत मराठी मतदार आहेत. यंदा साई पक्षाचा पाठिंबाही भाजपला आहे.

एकूण मतदार

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात २ लाख ३२ हजार ७७१ मतदार आहेत. यात १ लाख २७ हजार ८३९ पुरुष तर १ लाख ४ हजार ८९९ महिला मतदार आहेत. तर ३३ तृतीयपंथी मतदार आहेत.

 मतदारसंघाची हद्द

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कॅम्प एक ते

तीनचा भाग येतो. तसेच शेजारच्या म्हारळ, वरप आणि कांबा या तीन ग्रामपंचायतीचाही याच मतदारसंघात समावेश आहे.