भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
डोंबिवली येथे प्रचारानिमित्त आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव करताना विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर ओढलेला आसूड येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. भाजप समर्थक संघाची विचारसरणी असलेला मोठा वर्ग डोंबिवलीत आहे. या शहराला सुशिक्षित, सांस्कृतिक रूप संघाच्या जडणघडणीत तयार झाले आहे. असे असताना सुशिक्षित नागरिकांचे बकाल शहर अशी या शहराची अवस्था कोणी केली, असा सवाल उपस्थित करत शहराच्या दैनावस्थेवर राज यांनी बोट ठेवल्याने भाजप गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे.
डीएनसी शाळेच्या मैदानावर कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील, डोंबिवलीतील मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते.गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली शहरातील असुविधांविषयी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे टीकेचा आसूड ओढला जात असून येथील बहुसंख्य मतदार समस्यांविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. डोंबिवलीत आलेल्या काही कलाकारांनीही या शहरातील अव्यवस्थेविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी रात्री झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत त्यांनी येथील नागरी समस्यांवर परखड भाष्य करताना संघाच्या जुन्या जाणत्यांना घातलेली साद चर्चेचा विषय ठरला आहे.
१९२५ मध्ये डॉ. हेडगेवार यांनी विविध भागात विधायक कामे करून संघ वाढविला. त्याच संघाच्या मुशीत तयार झालेल्या पक्षाच्या हातात आता सत्ता आहे. मग त्यांनी तपश्चर्या करून केलेली विधायक कामे कोठे आणि यांची ही असली कामे कोठे, अशी टीका राज यांनी केली. मुशीत तयार झालेल्या लोकांनी निवडून दिलेले सरकार राज्यात आहे. तरीही या शहराचा विकास होत नाही. या शहराचे आमदार, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आहेत. त्यांना तुम्ही नागरी समस्यांच्या विषयावर प्रश्न विचारत का नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थितांना केला. साचेबद्ध विचारसरणीचा विचार करणारा मतदार बाहेर काय चाललेय याचा विचार करीत नाही. तो निवडणुका आल्या की ठरावीक बटन जाऊन दाबतो आणि निवांत राहतो. हा वर्गही शहराच्या विकासाला मारक आहे, असे राज यांनी सांगितले.
६५०० कोटींच्या पॅकेजचे काय?
डोंबिवली देशातील सर्वात सुशिक्षित असलेल्या लोकांचे शहर आहे. सर्वाधिक सनदी लेखापाल या शहरातून बाहेर पडतात. परदेशी जाणारे, राहणारे लोक या शहरात अधिक आहेत. अशा या सुशिक्षितांच्या नगरीचे वेळोवेळी ऑडिट न झाल्याने ही शहरे बकाल झालीत. कल्याण, डोंबिवली स्मार्ट शहरे होणार आहेत. या शहरांचे सध्याचे रूपडे बघितले तर स्मार्ट लोकांची ही बकाल नगरी आहे, असे ठाकरे म्हणाले. या शहरांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटीचे पॅकेज दिले. पाच वर्षांत काय झाले त्याचे. मुख्यमंत्री सुशिक्षित, तरुण आहेत पण खोटेपणा कशाला करता. लोकांनी प्रगतीसाठी बहुमत दिले असेल तर किमान त्याची चाड ठेवणे हे या सरकारचे कर्तव्य नाही का, असा प्रश्न राज यांनी केला.