|| नीलेश पानमंद
कळवा-मुंब्रा मतदारसंघातील जितेंद्र आव्हाडांचे वर्चस्व आणि लोकसभा निवडणुकीत भिवंडीतील दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली मोठी आघाडी यामुळे दोन्ही काँग्रेसला विजयाची अंधूक आशा दिसत होती. मात्र, मुस्लीमबहुल असलेल्या भिवंडी भागातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघांत उत्तम संधी असूनही केवळ उमेदवार चुकल्यामुळे काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने जिल्ह्य़ात पक्षाचे पानीपत झाले असून शहापुरात राष्ट्रवादीने अचूक खेळी करत विजय पदरात पाडून घेतल्याने पक्षाने अस्तित्व कायम राखले आहे.
शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्य़ात पाच वर्षांपासून भाजपची ताकद वाढली असून राष्ट्रवादीचे बडे नेते या पक्षात गेल्याने यंदाही जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी यशाची फारशी अपेक्षा बाळगली नव्हती. जिल्ह्य़ातील १८ जागांपैकी कळवा-मुंब्रा या एकमेव मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांना विजयाची खात्री होती. लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही मतदारसंघांत काँग्रेला मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे कळवा-मुंब्रापाठोपाठ येथेही काँग्रेसला यश मिळू शकते असा अंदाज बांधला जात होता. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना टक्कर देता येईल असाही काँग्रेस नेत्यांचा दावा होता. मात्र, यापैकी एकाही जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही.
भिवंडीत उमेदवारनिवड फसली
ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला विजयाची खात्री होती. पश्चिमेत भाजपचे विद्यमान आमदार महेश चौगुले पुन्हा विजयी झाले आहेत. तर पूर्वेत समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार रूपेश म्हात्रे यांचा पराभव केला. पूर्वेत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, एरवी कुणी जमेसही धरले नसलेल्या समाजवादी पक्षाने येथे विजय मिळवून शिवसेनेसोबतच काँग्रेसलाही जोरदार धक्का दिला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिमेतून भाजपचे महेश चौघुले तर पूर्वेतून शिवसेनेचे रूपेश म्हात्रे हे विजयी झाले होते. या दोघांच्या विजयामुळे भिवंडी महापालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. महापालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. पूर्वेतून २४ तर पश्चिमेतून २३ नगरसेवक निवडून आले होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्वेतून २२ हजार तर पश्चिमेतून २५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठिकाणी काँग्रेस विजयी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात पश्चिमेतून भाजपचे महेश चौघुले हे पुन्हा विजयी झाले असून या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शोएब खान यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकाची मते अपक्ष उमेदवार खालीद गुड्ड यांना मिळाली आहेत. खालीद हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. मात्र, बंडखोरी केली होती. त्यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. खालीद यांच्या बंडखोरीचा फटका येथे काँग्रेसला बसल्याचे चित्र आहे.
दहा वर्षांनंतर गड काबीज
१० वर्षांपूर्वी म्हणजेच २००९ च्या निवडणुकीत भिवंडी पूर्वेतून समाजवादी पक्षाचे अबु आझमी हे विजयी झाले होते. मात्र, दोन मतदारसंघांतून विजयी झाल्यामुळे त्यांनी भिवंडी पूर्वेतून राजीनामा दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी सपाला पराभूत केले होते. गेली १० वर्षे या ठिकाणी शिवसेनेचे रूपेश म्हात्रे हे आमदार होते. यंदा सपाचे रईस शेख यांनी म्हात्रे यांचा पराभव करून १० वर्षांनंतर सपाचा गड काबीज केला आहे.