शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजू पाटील यांना रिंगणात उतरविल्याने येथील निवडणुकीत रंगत आली आहे. विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी नाकारत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथून डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना रिंगणात उतरविले आहे.
पाच वर्षांपूर्वी म्हात्रे यांना भाजपकडून पक्षाचा अधिकृत अर्ज मिळाला होता. मात्र, शिंदे यांनी वेगाने हालचाली करत म्हात्रे यांचे बंड थोपविले आणि सुभाष भोईर आमदार झाले. यावेळी उमेदवारी मिळाली नसती तर म्हात्रे पुन्हा बंडखोरीच्या मन:स्थितीत होते. पुन्हा भोईर यांच्या कामगिरीविषयी शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे शिवसेनेने येथून भाकरी बदलण्याचा निर्णय घेतला असला, तरी राजू पाटील यांच्या आव्हानामुळे येथील निवडणूक रंगतदार बनली आहे.
या मतदारसंघातील दिवा तसेच आसपासच्या परिसरात शिवसेनेची मोठी ताकद आहे. या ताकदीच्या जोरावरच गेल्या वेळी सुभाष भोईर निवडून आले होते. यंदा शिवसेनेने येथून रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना उमेदवारी देऊन नवी खेळी खेळली आहे. भोईर यांच्या उमेदवारीस पालकमंत्री शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा टोकाचा विरोध होता. दिव्यातील शिवसेनेचा एक मोठा गटही त्यामुळे सक्रिय झाला आणि उमेदवार बदला असा दबावगट शिवसेनेत तयार झाला. उमेदवारी मिळाली नसल्याने विद्यमान आमदार भोईर यांचा गट नाराज असला तरी त्यांचा विरोधी गट मात्र शिवसेनेत रमेश म्हात्रे यांच्यासाठी जोमाने कामाला लागला आहे.
या मतदारसंघावर आगरी समाजाचे वर्चस्व आहे. मनसेचे रमेश पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी या भागाचे नेतृत्व केले आहे. हाच विचार करून मनसेने या भागात काटईचे रहिवासी, रमेश पाटील यांचे बंधू प्रमोद (राजू) पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भोईर यांच्याविषयी विकासावरून ग्रामीणमध्ये नाराजी होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू पाटील यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत पाटील यांनी हवा निर्माण केली होती. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेने २७ गावे आणि आसपासच्या परिसरातील भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आणत पाटील यांच्या प्रचारातील हवा काढली होती. मोदी लाटेत शिंदे यांच्या पुढे पाटील यांचा टिकाव लागला नव्हता. यंदाही पाटील कुटुंबीयांच्या पराभवासाठी शिंदे पिता-पुत्रांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीत पाटील यांना उघड पाठिंबा दिला आहे. तसेच २७ गावांची नगरपालिका करण्याच्या मुद्दय़ावरून भाजप आणि शिवसेनेविषयी नाराज असलेला एक मोठा घटक या भागात कार्यरत आहे. हा मुद्दाही पथ्यावर पाडून घेण्यासाठी मनसेचे नेते प्रयत्नशील आहेत. असे असले तरी शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला ते किती टक्कर देऊ शकतील यावर येथील निकाल अवलंबून आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीतील भूखंड घोटाळ्याचे प्रकरण यंदाही मतदानाच्या तोंडावर शिवसेना बाहेर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुद्दय़ास मनसेकडून कसे उत्तर दिले जाते यावरही बरेच काही अवलंबून आहे.
प्रमुख उमेदवार
रमेश सुकऱ्या म्हात्रे- शिवसेना
प्रमोद (राजू) पाटील- मनसे
मतदारसंघ हद्द
डोंबिवली पूर्व शहरातील गांधीनगर, गोग्रासवाडी, जिमखाना परिसर, भाल, वसार, नेवाळी, पोसरी,मलंगपट्टी, कुंभार्ली, शिळफाटा चौक, शिळ, दिवा, मानपाडा अशी या मतदारसंघाची हद्द असून या मतदारसंघावर आगरी समाजाचे वर्चस्व आहे.