शहापूर, कल्याण ग्रामीण, कळव्यात गणिते चुकल्याने नेतृत्वावर प्रश्न

ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला तोडीस तोड उत्तर देत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय आव्हान अनेकदा परतावून लावणारे शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रचलेल्या चालींना मिळालेले समिश्र यश शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. शहापुरात चुकलेला उमेदवार, कळवा-मुब्रयात स्थानिक शिवसैनिकांना डावलून दिलेली उमेदवारी, कल्याण ग्रामीण मतदारसंघात उमेदवार बदलताना घातलेला गोंधळ आणि पालघर जिल्ह्य़ात धरलेला धोक्याचा जागांचा आग्रह शिवसेनेच्या चांगलाच अंगलट आला आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील जागा वाटपात भाजपकडून नऊ जागा पदरात पाडून घेताना शिंदे यांनी मुत्सद्देगिरीचा प्रत्यय आणून दिला. कल्याण पश्चिमेसारखी भाजपच्या ताब्यात असलेली जागा पदरात पाडून घेतली. हे करत असताना नवी मुंबई महापालिका हद्दीतील दोन्ही जागांवर पक्षाने पाणी सोडले असले तरी कल्याण पश्चिमेतील जागा तुलनेने सोपी असेल असा दावा शिवसेनेकडून केला जात होता. हे करत असताना पालघर जिल्ह्य़ातील हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व असलेल्या जागांवरही शिंदे यांनी दावा केला. पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि शिंदे यांचे निकटचे संबंध राहिले आहे. उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव असलेल्या नालासोपाऱ्यातून शर्मा यांना उतरविण्यासाठी शिंदे यांनी अवघड असलेल्या या मतदारसंघावर दावा सांगितला. या जागेवर शर्मा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पाच वर्षांपूर्वी शहापूर मतदारसंघातून पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार दौलत दरोडा यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात बरोरा विरुद्ध दरोडा असा जुना सामना राहिला आहे. असे असताना शिंदे यांनी बरोरा यांच्यामागे ताकद लावली. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांच्या पराभवासाठी राब राब राबणारे बरोरा पालकमंत्र्यांच्या खास गोटात दिसू लागले तेव्हाच हा असंतोष टिपेला पोहचला होता. बरोरा यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसैनिकांनी या निर्णयाविरोधात काम करण्याचे ठरविले. वयामुळे काहीसे थकलेले तरीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दरोडा यांच्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने काम केले. हे एकप्रकारे शिंदे यांनाच दिलेले आव्हान असल्याची चर्चा आता रंगली आहे.

ग्रामीणमधील गोंधळ नडला

कल्याण ग्रामीण मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्याविरोधात नाराजीचा सूर असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये असे एका मोठय़ा गटाचे म्हणणे होते. तरीही शिंदे यांनी भोईर यांना एबी फॉर्म मिळवून दिला. त्यानंतर शिवसैनिक टोकाचा विरोध करू लागले आहे हे लक्षात येताच शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवार बदलला. हे करत असताना पक्षातील सावळागोंधळ पुढे आला. मातोश्रीवरून ज्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला जातो तोच पुन्हा मागे घेतला जातो हा गोंधळ काही शिवसैनिकांच्याही पचनी पडला नाही. पुन्हा आक्रमक स्वभावाच्या रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करून राजू पाटील यांना सहानभूती मिळवून देण्याची चुकही शिवसेनेच्या अंगलट आली आहे. ग्रामीण पाठोपाठ कल्याण पूर्वेत धनजंय बोडारे या नगरसेवकाची बंडखोरी रोखण्यात शिंदे यांना आलेले अपयश या भागात युतीमधील दोन पक्षांतील भविष्यातील संघर्षांची पायाभरणी ठरणार आहे. या बंडखोरीमुळे नाराज आमदार गणपत गायकवाड यांनी जाहीरपणे शिंदे पिता-पुत्रांविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली असून पालिका निवडणुकीत पडसाद उमटताना दिसतील असे चित्र आहे.