माजी मंत्री आणि भाजपचे आमदार विष्णू सावरा यांनी सलग पाच वेळा भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यामुळे हा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. जिल्हा विभाजनानंतर म्हणजेच पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सावरा यांनी भिवंडी ग्रामीण सोडून विक्रमगडमधून निवडणूक लढविली. त्यामुळे या निवडणुकीत भिवंडी ग्रामीण हा भाजपचा गड शिवसेनेला काबीज करण्यात यश आले. यंदा युतीतर्फे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे हे निवडणूक लढवीत आहेत.

या मतदारसंघातून ८० च्या दशकात काँग्रेसचे गौरी शंकर हे दोन वेळा निवडून आले होते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. तसेच या मतदारसंघामध्ये मनसेला दोनदा तिसऱ्या क्रंमाकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून त्यात शिवसेना गड राखणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती झाली. या विभाजनानंतर झालेल्या म्हणजेच २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे विष्णू सावरा यांनी भिवंडी ग्रामीण सोडून विक्रमगडमधून निवडणूक लढविली. तर राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणारे शांताराम पाटील यांनी भिवंडी ग्रामीणमधून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती तुटली होती. त्यामुळे शिवसेनेने शांताराम मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. या मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असायची. मात्र, २०१४ मध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली. अटीतटीच्या सामन्यात शिवसेनेचे शांताराम मोरे हे नऊ हजार मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून मोरे ओळखले जातात. त्यामुळे मोरे यांच्या विजयात प्रकाश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या निवडणुकीनंतर ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने स्वत:ची ताकद वाढविली. जिल्हा परिषद निवडणुकीत भिवंडीतील २१ जागांपैकी १० जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे खासदार कपिल पाटील आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्यात वाद होते. मात्र, निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे त्यांच्यातील वाद मिटले. तसेच यंदाची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष युतीमध्ये लढवीत असून यामुळे सद्य:स्थितीत युतीचे पारडे जड झाले आहे.

२०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत झाली असली, तरी त्यापूर्वीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी निवडणूक झाली आहे. २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. राष्ट्रवादी चौथ्या तरकाँग्रेस पाचव्या क्रमांकावर होती. मात्र, त्यापूर्वीच्या निवडणुकीत आजवर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. तसेच २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत रंगली आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण परिसर या मतदारसंघात येतो. मात्र, त्यापैकी अनेक गावात इमारती उभ्या राहिल्या असून या भागाला शहरी रूप आले आहे. शहरी भागातील रहिवासी नव मतदार आहेत. या मतदारांवरच सर्व उमेदवारांची भिस्त आहे.

उमेदवार

  •   शांताराम मोरे (शिवसेना)
  •   माधुरी म्हात्रे (राष्ट्रवादी)
  •  शुभांगी गोवारी (मनसे)

मतदारसंघ हद्द

या मतदारसंघामध्ये भिवंडी तालुक्यातील कशेळी-काल्हेर, दिघाशी, आनगाव, पडघा, खारबाव, कोन आणि उर्वरित गावे येतात. याशिवाय, वाडा तालुक्यातील काही परिसर येतो.

ल्ल नव मतदार मतदारांवरच सर्व उमेदवारांची भिस्त आहे.