मतमोजणी प्रकिया संपेपर्यंत वाहतूक बंद राहणार
अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गालगतच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये गुरुवारी मतमोजणी होणार असून या पाश्र्वभूमीवर हा मार्ग बुधवार, २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा बदल लागू करण्यात आला आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतपेटय़ा अंबरनाथ पश्चिमेतील महात्मा गांधी विद्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. तर मतमोजणीची प्रक्रियाही याच विद्यालयात पार पडणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचा अंबरनाथमधील मटका चौक ते डीएमसी चौक हा भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवार, २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत हा वाहतूक बदल लागू राहणार आहे. या काळात कल्याण-अंबरनाथकडून येणारी आणि बदलापूरच्या दिशेला जाणारी वाहतूक मटका चौक, उड्डाणपूल, हुतात्मा चौक, स्वामी समर्थ चौक, वडवली, आनंदनगर एमआयडीसीमार्गे सुरू राहणार आहे. तर बदलापूरहून अंबरनाथकडे येणारी वाहतूक फॉरेस्ट नाका, टी पॉइंट, आनंदनगर एमआयडीसीमार्गे वडवली, स्वामी समर्थ चौक, मटका चौक अशी सुरू राहणार आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील स्थानक शेजारील रिक्षा आणि इतर वाहतुकीला अडसर येऊ नये म्हणून ही वाहतूक पोलीस पेट्रोल पंप, डीएमसी चौक मार्गे वळवण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा, अग्निशमन दलाचे वाहन, पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका आणि निवडणूक कार्यात आवश्यक वाहनांची वाहतूक या मार्गावरून सुरू राहील, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.