कल्याण-शीळ रस्ता हा कायमच वाहतुकीने गजबजलेला रस्ता आहे. या ठिकाणी मेट्रोचं काम सुरु झाल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं आहे. याच वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्य्यांनी ने आण करणाऱ्या बसेसनाही बसला आहे. त्यामुळे शाळांचं वेळापत्रक कोलमडलं असून दुपारच्या सत्रांतल्या शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली आहे. मेट्रोचं काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी होणं हे रोजचंच झालं आहे. वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्ते वाहतुकीचा बोजवरा उडाला आहे.
नेमकं काय झालं?
कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रो १२ चं काम सुरु करण्यात आलं आहे. या कामामुळे रस्ता व्यापला गेला असून वाहतूक कोंडी होणं ही नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, दुचाकीस्वार सगळेच बेजार झाले आहेत. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, शाळांच्या बसेस अडकत असल्याने विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल होत आहेत. आज सकाळीही नेहमीप्रमाणे शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. मानपाडा भागात असलेल्या विद्यानिकेतन शाळेच्या बसेस कोंडीत अडकल्या. साडेअकरा वाजून गेल्यानंतरही बस शाळेत पोहचल्या नाहीत. त्यामुळे या शाळेला दुपारच्या सत्रातील शाळेला अचानक सुट्टी जाहीर करावी लागली. याबाबत विद्यानिकेतन शाळेचे संचालक विवेक पंडीत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
डोंबिवलीत बेकायदा चाळींवर कारवाई
विवेक पंडीत यांनी काय म्हटलं आहे?
“आज सकाळपासूनच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर आहे.सकाळी कळलं की एक एक तास बसेस उशिरा होणार आहेत. सकाळच्या आलेल्या बस जर वेळेत सोडायच्या असतील तर आम्हाला दुपारचं सत्र म्हणजेच दुपारी भरणारी शाळा बंद ठेवणं आवश्यक आहे. कारण हे ट्रॅफिक संपणार नाही हे दिसतं आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ट्रॅफिकचं नियोजन जसं झालं पाहिजे तसं झालेलं नाही. त्याचा परिणाम शाळांना भोगावा लागतो आहे. आज ज्या मुलांचे वर्ग घेतले नाहीत त्यांना पुढच्या आठवड्यात बोलवणार आहोत. सुट्टीच्या दिवशी त्यांना आम्ही शाळेत बोलवू. डोंबिवलीकरांना ही विनंती आहे की त्यांनी वाहनं योग्य पद्धतीने चालवावीत. घाई करु नयेत. ट्रॅफिक कर्मचारी अपुरे असतात. ट्रॅफिक वाढलं आहे. आपल्या गाडीने जायची सवय लोकांना लागली आहे. मेट्रोचं काम आणखी वाढेल तेव्हा काय होईल याची काळजी आम्हाला आत्ताच वाटू लागली आहे.”
या घटनेनंतर वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद ठेवणं ही बाब आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून लज्जास्पद वाटते आहे असं मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
आमदार राजू पाटील काय म्हणाले?
ट्रॅफिक जाम होणार आहेच कारण बेशीस्तपणे मेट्रोचं काम सुरु आहे. ज्या प्रकारे काम केलं जातं आहे तिथून वाहतूक कोंडी होणं अपरिहार्य आहे. रस्ता व्यवस्थित सोडलेला नाही. शेतकऱ्यांना जागेचा मोबदला दिलेला नाही, त्यामुळे काही ठिकाणी काम रखडलं आहे. नियोजन शून्य कारभार दिसून येतो आहे. जनतेच्या पैशांची नासाडी सुरु आहे. चार दिवसांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंना याबाबत फोन केला होता. उद्या मी त्यांना भेटणार आहे. ट्रॅफिकमुळे शाळा बंद ठेवावी लागते ही आमच्यासाठी लज्जास्पद बाब आहे असंही परखड मत राजू पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसंच आम्ही यावर मार्ग काढू असंही आश्वासन दिलं आहे.