पावसाच्या दिरंगाईने महागाईला आमंत्रण
पाऊस लांबणीवर पडलेल्यामुळे महागाई वाढणार असून तीव्र उन्हामुळे भाज्यांवर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या भाज्यांसाठीदेखील गृहिणींना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे सरकारने पुढील काही दिवसांत महागाई आटोक्यात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
प्रज्ञा वैद्य, कल्याण
तर पाणी होणार महाग
जून महिन्याचे मध्यंतर आला तरी पाऊस सुरू झालेला नाही हे चित्र चिंता वाढविणारे आहे. उन्हाळ्यामुळे जीव कासावीस होत असताना बाजारात पुरेशा प्रमाणात भाज्याही उपलब्ध नाहीत. गेल्या वर्षी पाऊस कमी होता. यंदाही पावसाने ओढ घेतल्याने भीती वाटू लागली आहे.
आदित्य देशमुख, ठाणे</p>
शेतीवर संकट कोसळणार..
मोसमी पाऊस लांबल्याने सर्वच बाबतीत त्रास सहन करावा लागत आहे. भाजीपाला महाग झाला आहे. गेल्या वर्षी पाऊस न पडल्याने २० टक्के पाणीकपात केली होती. या वेळी पाऊस पडला नाही तर १०० टक्केच पाणीकपात करावे लागेल. तसेच शेतीवर देखील संकट कोसळणार आहे.
नम्रता कर्वे, ठाणे
भाज्यांना सोन्याचा भाव..
पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम भाज्यांवर झाला. बाजारात निवडक भाज्या त्याही चढय़ा दराने आहेत. गरिबांना तर त्याही खरेदी करता येत नाहीत. अशीच परिस्थिती राहीली तर उद्या भाज्यांना सोन्याचे भाव येतील.
नेहा हाटे, डोंबिवली
भाज्यांना पर्याय नाही
मोठय़ा भाजी मंडईत भाज्यांचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. जून महिन्यात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या बाजारात उपलब्ध होतात. फरसबीसारखी एखादी भाजी महाग असल्यास स्वस्त भाज्यांचा पर्याय गृहिणींकडे असतो. मात्र दिवसेंदिवस इतर भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने ज्या दरात भाजी उपलब्ध होते त्याच दरात विकत घेण्याशिवाय गृहिणींकडे पर्याय नसतो.
मनीषा गोळे, ठाणे
कधी रे येशील तू..
मोसमी पाऊस लवकर येणार असे म्हणता म्हणता आता तो लांबणीवर पडल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. बाजारात केवळ भेंडी, गवार, कोबी या भाज्या असून त्यांचेही दर चढय़ा भावाने आहेत. भाजी खावी की नाही, हा तर प्रश्न आहेच, शिवाय त्याच त्याच भाज्या खाव्या लागत असल्याने त्यांचाही कंटाळा आला आहे.
कांचन शिरसागर, डोंबिवली.