‘‘आई-बाप वा गुरूनंतर,
जिथे झुकावे हर एक मस्तक
जगात आहे एकच जागा,
ज्या जागेवर असे पुस्तक’’
‘अक्षरऋतू’ या प्रमोद जोशींच्या काव्यसंग्रहातील पुस्तकाचे महत्त्व सांगणाऱ्या या ओळी मनाला भिडतात. आपण का वाचायला हवे हे या ओळीतून स्पष्ट होते. अनेकांना लहानपणापासून वाचनाची सवय लागते. मला मात्र महाविद्यालयात गेल्यावर वाचनाची रुची निर्माण झाली. जोशी-बेडेकर महाविद्यालयात शिकत असताना पुस्तकांच्या सान्निध्यात आलो आणि तेव्हापासून वाचनाची आवड कायम आहे. समीरा गुजर, तुषार देवल अशा काही माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत ‘आनंदयात्रा कवितांची’ असा कवितांचा कार्यक्रम करायचो. बा.भ.बोरकर, कुसुमाग्रज, ग.दि.माडगूळकर, शांता शेळके या कवींच्या काही निवडक कविता घेऊन काव्यात्मक स्वरूपात गाणी सादर करत होतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचन सुरूझाले. बा.भ.बोरकरांचे ‘चित्रवेणा’, कुसुमाग्रजांचे बहुतांश काव्यसंग्रह वाचले. पु.ल. देशपांडे माझे आवडते लेखक आहेत. त्यामुळे पु.ल.देशपांडे यांचे बरेचसे साहित्य वाचून झाले. ‘वाऱ्यावरची वरात’, ‘अघळपघळ’, ‘बटाटय़ाची चाळ’, ‘नस्ती उठाठेव’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ अशी पुस्तके वाचली. ‘बटाटय़ाची चाळ’ या नाटकात माझी व्यक्तिरेखा असल्याने वाचलेल्या पुस्तकाचा भूमिका साकारताना खूप उपयोग झाला. वि.स.खांडेकरांचे ‘ययाति’ वाचले. ‘पडघवली’, शिवाजी सावंतांचे ‘मृत्युंजय’अशी पुस्तके वाचली. आचार्य अत्रेंच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या पुस्तकाचे सर्व खंड मी वाचले. प्रभाकर पणशीकरांचे ‘तोच मी’ हे आत्मचरित्र वाचले. अशोक समेळांची ‘अश्वत्थामा’ कादंबरी वाचली. ठाण्यातील जिजामाता ट्रस्टच्या शारदा वाचनलयाचा माझ्या वाचनासाठी खूप उपयोग झाला. या ग्रंथालयातील पुस्तके घेऊन मी वाचत होतो. प्रत्येकाने वाचन करावे यासाठी माझ्या कार्यक्रमात मी पुस्तके भेट देतो. संत साहित्यातील अभंग निरुपण वाचतो. एखादा कार्यक्रम करताना संदर्भ हवे असतात. संतसाहित्य वाचत असल्यामुळे संदर्भासाठी या वाचनाचा खूप उपयोग होतो. सर्वात जास्त विनोदी साहित्य वाचायला आवडते.
पूर्वीची वाचनाची आवड बदलली असे झाले नाही, कारण हरतऱ्हेच्या वाचन प्रकारात मी रमतो. नाटके खूप वाचतो. बाळ कोल्हटकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर यांची नाटके वाचली. जयवंत दळवींचे बॅरिस्टर, कानेटकरांचे अश्रूंची झाली फुले अशी नाटके वाचली. कवितांचे कार्यक्रम सादर करत असल्यामुले एखादी कविता मीटरमध्ये नीट सादर करण्यासाठी वेगवेगळ्या कवितांचे वाचन करत असतो. बाबूजींचे ‘जगाच्या पाठीवर’ हे पुस्तक वाचले. सध्या गदिमा साहित्य नवनीत हे पुस्तक वाचत आहे.
कादंबरी हा साहित्यप्रकार मला फारसा वाचायला आवडत नाही. व.पु.काळे यांचा ‘महोत्सव’ हा कथासंग्रह मी अनेकदा वाचला. त्यातील ट्रस्टी ही कथा मला खूप आवडली. धनंजय देशपांडे यांचे ‘दिव्यस्पर्शी’, विश्वास नेरुरकर आणि विश्वनाथ बॅनर्जी यांनी लिहिलेले ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, वसंत पोतदारांचे ‘कुमार गंधर्व’, आश्विन सांघी यांचे ‘चाणक्यमंत्र’, व.पु.काळे यांचे ‘स्वर’ अशी काही आवडती पुस्तके आहेत. यशवंत देव यांच्या ‘शब्दसुरांच्या संगती’, जयराम पोतदार यांचे ‘वेध’ मराठी नाटय़संगीताचा अशी पुस्तके संग्रहात आहेत. वेळ मिळेल तेव्हा तरुणांनी वाचावे. आपण सर्वागाने समृद्ध केवळ वाचनाने होतो. मंगेश पाडगांवकरांचे ‘जिप्सी’, कुसुमाग्रजांचे ‘विशाखा’, ना.धो.महानोर, वि.दा.करंदीकर यासारख्या कवींच्या लेखनामुळे प्रतिभा आजमावता येते. शब्दकला अवगत होते. एखादा प्रसंग उभा करण्याचे विलक्षण सामथ्र्य या प्रतिभावान लेखक, कवींकडे आहे. हे वाचन ग्रहण करून आपण समृद्ध व्हायला हवे.
शब्दांकन – किन्नरी जाधव