कल्याण – उध्दव बाळासाहेर ठाकरे पक्षाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेतेचा पदाचा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाकडून कल्याणमधील पदे देताना, संघटनात्मक बाबी आणि सचिन बासरे यांना उमदेवारी देताना आपणास विश्वास घेतले नाही. या सगळ्या घाणेरड्या राजकारणामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत आहोत, असे ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी यांनी पत्रात म्हटले आहे.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विजय साळवी यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे गटातील कल्याणमधील शिवसैनिकांनी नापसंती व्यक्त केली. कल्याणमधील शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून विजय साळवी यांची ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहिले.
हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही
साळवी यांनी शिंदेसेनेत यावे म्हणून त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव, पोलिस दबावतंत्राचा वापर करण्यात आला. त्याला ते बधले नाहीत. तडीपारीची नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. आपण निष्ठावान राहिल्याने पक्षाने आपणास जिल्हाप्रमुख, उपनेतेपद दिले. आपण तंदुरुस्त असताना अचानक आपले जिल्हाप्रमुख पद काढून घेतले. पक्ष संघटनेते पदे देताना आपणास विश्वासात घेतले नाही याची खंत साळवी यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास नेहमीच विचारात घेऊन पक्षातील पदे, उमेदवारी देताना विचारात घ्यायचे. तसा विश्वास आता आपणावर दाखवला जात नव्हता. पक्षप्रमुखांनी आपणास चार वेळा कल्याण पश्चिम विधानसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा केली. आपण त्यास नकार दिला. उमेदवारीसाठी आपण कोणाचे नाव सुचविले नव्हते. पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम करीन असे सांगितले होते. सचिन बासरे यांना कल्याण पश्चिमेची उमेदवारी देताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आपणास खोटे बोलून मातोश्री बाहेर जाण्यास सांगितले. गुपचूप व चोरून बासरे यांना अधिकृत उमेदवारी अर्ज दिला. या सर्व अपमानास्पद प्रकरणाने आपण व्यथित झालो आहोत असे यांनी साळवी यांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
सचिन बासरे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्या बैठकीत आपणास बोलविले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी निरोप पोहचविला नाही. बासरे यांच्या सोबत उमेदवारी अर्ज भरताना महेश तपासे, अल्ताफ शेख, मी स्वता होतो. दुसऱ्याच्या दिवशीच्या वृत्तांमध्ये माझे नाव, छायाचित्र नव्हते, अशी खंत साळवी यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
प्रचारा सुरू असताना उमेदवार बासरे आपणास भेटत नाहीत. संपर्क करत नाहीत. दिलगिरी व्यक्त करत नाहीत. म्हणजे प्रचारासाठी आपली गरज नाही हेच दिसते. या घाणेरड्या राजकारणामुळे आपण पक्ष उपनेतेपदाचा राजीनामा देत आहोत, असे विजय साळवी यांनी पत्रात म्हटले आहे.
पहिल्या दिवसापासून विजय साळवी यांना कार्यकर्ते सर्व प्रकारचे निरोप देत होते. ही निवडणूक आहे. येथे पक्षाचा उमेदवार आहे. त्यामुळे नेता म्हणून साळवी यांनी स्वताहून प्रचारात पुढाकार घेणे आवश्यक होते. ते मुद्दाम प्रत्येकवेळी वेळकाढूपणा करत राहिले. निवडणूक धामधुमीत राजीनामा देऊन त्यांनी रण सोडले. शिवसैनिक त्याचा योग्य अर्थ काढतील.-सुधीर बासरे, माजी नगरसेवक.