बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा ६१९ कोटी ५७ लाख रूपये उत्पन्नाचा तर ६१९ कोटी ५२ लाख रूपये खर्चाचा असा ५ लाख ०४ हजारांचा शिलकी अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांना लेखापाल विकास चव्हाण यांनी सादर केला. कोणतीही करवाढ या अंदाजपत्रकात करण्यात आलेली नाही. तर नवा कोणताही प्रकल्प आखण्यात आलेला नाही.

प्रशासकीय राजवटीतील पाचवे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांना सादर करण्यात आले. लेखापाल विकास चव्हाण यांनी २०२४-२५ चे सुधारित आणि २०२५-२६ चे अंदाजपत्रक सादर केले. हे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. एकूण ६१९ कोटी ५७ लाख रूपये उत्पन्नाचा तर ६१९ कोटी ५२ लाख रूपये खर्चाचे तसेच ५.०४ लाख रूपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. यंदाच्या अंदाजपत्रकातही कोणतीही कर वाढ सुचवण्यात आलेली नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. लोकप्रतिनिधींचा थेट सहभाग नसल्याने लोकप्रिय घोषणांचा अभाव या अंदाजपत्रकामध्ये आहे. मात्र तरीही अनेक महत्वाच्या कामांसाठी पालिकेने निधीची तरतूद केली आहे. शहरातील प्रकल्पांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी भूसंपादन आरक्षणातील जागा ताब्यात घेण्याकरिता ९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास योजनेतील आरक्षण विकसित करण्याकरिता १ कोटी, स्मारक विकसित करणे आणि इतर अनुषंगिक कामांसाठी २ कोटी २५ लाखांचा तरतूद करण्यात आली आहे. वृक्ष खरेदी, लागवड आणि संवर्धनासाठी तब्बल ११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी साधारणतः दोन कोटींपर्यंतचा खर्च यासाठी केला जात होता. यंदा मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. नवीन गटारे आणि नाले बांधण्यासाठी २.५० कोटी तर मोठा नाला बंदिस्त करण्यासाठी १० कोटी रूपयांचा तरतूद करण्यात आली आहे. रस्ते बांधणी आणि सुधारण्यासाठी २.५ कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.

नव्या सिग्नलसाठी तरतूद

अंबरनाथ शहराप्रमाणे बदलापूर शहरातही आता वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरात नव्या पथदिव्यांसाठी २ कोटी ७५ लाख रूपयांचा खर्च केला जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पासाठी ३४ कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याचवेळी आपत्ती व्यवस्थापनासाठी मात्र २५ लाखांची तरतूद केलेली आहे.

इतर महत्वाच्या तरतूदी

महिला व बालकल्याण विभागासाठी १.३९ कोटी

दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी १.३९ कोटी

ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी १० लाख

उद्यान विकासासाठी ७५ लाख

पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी ४.२५ कोटी

नाले सफाई ५० लाख

Story img Loader