बेडीस गाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड
बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले असले तरी या परिसरातील अनेक वस्त्या प्रशासकीय घोळामुळे चुकीच्या तालुक्याला जोडल्या गेल्या आहेत. विशेषत: सीमेवरील गावांमध्ये ही समस्या मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. अंबरनाथ तालुक्याच्या सीमेवरील बेडीस गाव त्यापैकीच एक. जिल्ह्य़ांच्या सीमावर्ती भागातील गावांच्या नशिबी असलेल्या समस्यांचे दुखणे या आदिवासी गावाच्याही नशिबी आले आहे. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य व शिक्षण या प्राथमिक सुविधांची आबाळ आहेच, त्यात सीमेवर असल्याने प्रशासनाने अधिक दुर्लक्ष झाले आहे. अंबरनाथ तालुक्याला लागून असूनही दूरच्या कर्जत तालुक्यात फेकले गेल्याने प्रशासन व अन्य सुविधांपासून ही वस्ती कायम वंचित आहे.
अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर बेडीस गाव आहे. या बेडीस गावात एकूण नऊ आदिवासी वाडय़ा आहेत. मात्र, बेडीस नावाचा उगम कसा झाला हा प्रश्न येथील ग्रामस्थांसाठीही अनुत्तरितच आहे. शाळेची वाडी, आंबे वाडी, बोराची वाडी, गावठाण वाडी, वायाची वाडी, कोथरे वाडी, कुंड वाडी आणि दूर डोंगरावर असलेल्या दोन वाघिणीच्या वाडी यातून तयार झालेल्या या बेडीस गावाची लोकसंख्या ही १६०० च्या घरात आहे. नोकरीनिमित्त हल्ली-हल्लीच येथील ग्रामस्थ बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे मासेमारी, शेती, फळविक्री असे पारंपरिक व्यवसाय येथील मंडळी वैयक्तिक गरजांपुरतीच करतात. समस्यामय जीवनातून मार्ग काढताना येथील लोक सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आदींच्या माध्यमातून आनंद मिळवण्यात धन्यता मानतात. गावात सातवीपर्यंत जिल्हापरिषदेची शाळा असून शाळेत येणाऱ्या मुलांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मात्र, ‘साद फाऊंडेशन’ या संस्थेने शिक्षणाबद्दल सुरू केलेल्या अभियानामुळे आता अनेक मुले शाळेचा रस्ता पकडू लागली आहेत. इतकेच नव्हे तर, गावात पदवीधरांची संख्याही वाढत आहे. सध्या गावात सात पदवीधर असून तीन तरुण आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदवीकडे मार्गक्रमणा करत आहेत.
‘गावात माझ्या लहानपणी म्हणजे १५ वर्षांपूर्वी पक्का रस्ता बांधला होता, त्यानंतर रस्ताच तयार झाला नाही,’ असे यशवंत धुमणा हा तरुण हताशपणे सांगत होता. या रस्त्यांना कंटाळून अखेर रिक्षाचालकांनी गावात येणेच बंद केले आहे. तसेच, गावात विजेची तीव्र समस्या आहे. बऱ्याच वाडय़ांमध्ये ८ हजार ते २५ हजार इतके वीज बिल आल्याने अनेकांची वीज कापण्यात आली आहे. एवढी बिले यापूर्वी आली नसून वीज मीटर पाहण्यास शासनाकडून कोणीही न येता एवढे बिल येतेच कसे हा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक जणांनी आकडे टाकूनच वीज घेतली आहे. असेही पुढे धुमणा म्हणाला. डोंगराखालच्या आमच्या सात वाडय़ांमध्ये किमान वीज तरी आहे. मात्र, डोंगरावरील वाघिणीच्या दोन्ही वाडय़ांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. तसेच वायाची वाडी येथे एक आणि वाघिणीच्या वाडीला दोन छोटय़ा पुलांची तातडीची गरज आहे. मात्र वारंवार मागणी करूनही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. बोरिंगचेच पाणी आम्ही वापरत असून उन्हाळ्यात ते पाणी आटले की, एका विहिरीवरच अवलंबून राहावे लागते. या काळात डोंगरावरील वाघिणीच्या वाडय़ांमध्ये भीषण दुष्काळसृदश परिस्थिती असल्याचे धुमणाने सांगितले.
बेडीस गाव तांत्रिकदृष्टय़ा रायगड जिल्ह्य़ात येत असले तरी, भौगोलिक, सांस्कृतिकदृष्टय़ा या गावाचा रायगड जिल्ह्य़ाशी दुरान्वयेही संबंध येत नाही. कारण, गावात जाण्यासाठी असणारा एकमेव रस्ता हा अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावातून जातो. गावात पोहोचले की मागे डोंगर सुरू होतो. या डोंगरानंतर रायगड जिल्ह्य़ाची हद्द सुरू होणे अपेक्षित असताना ही हद्द दोन किलोमीटर आधीच सुरू झाल्याने हे गाव रायगडमध्ये फेकले गेले. मात्र, याचे परिणाम गंभीर असून नजीकच्या दोन किलोमीटरवरील वांगणी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या नागरिकांना वैद्यकीय उपचार नाकारले जातात. त्यामुळे येथील रहिवाशांना १५ किलोमीटरवरील नेरळ येथे जावे लागते. त्यात गरोदर महिलांची फारच आबाळ होत असून पोलिसी तक्रारीसाठीही नेरळ गाठावे लागते. जिल्हा मुख्यालयाला जाण्याचा विचारही येथील रहिवासी करू शकत नाहीत. कारण आलिबाग येथून शंभर किलोमीटर अंतरावर आहे.
‘साद फाऊंडेशन’ची साथ..
बेडीस गावातील या समस्या ओळखून अंबरनाथमधील प्रदीप कुलकर्णी यांनी ‘साद फाऊंडेशन’ची स्थापना करत या गावात सात वर्षांपूर्वी काम करण्यास सुरुवात केली. याबद्दल कुलकर्णी म्हणाले की, आरोग्य व शिक्षण या दोनच क्षेत्रांत प्राधान्याने काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. जास्तीत जास्त मुलांनी शिकावे व शाळाबाह्य़ मुलांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी काम करण्यास आम्ही सुरुवात केली. सध्या गावातून लगोरी व लंगडीचे संघ राज्य पातळीवर खेळण्यास सज्ज झाले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या स्नेहसंमेलनात २७ गटांनी नृत्याविष्कार सादर केले असून यात उत्स्फूर्तपणे मुलींनी आपले पोशाख सजविले होते. तसेच, आरोग्यासाठी आरोग्य शिबिरे घेण्यात येतात. तसेच गणिताची कार्यशाळा घेण्यात आली असून फाऊंडेशनच्या माधुरी पुराणिक व प्रीती कुलकर्णी नियमितपणे गावात येऊन पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेतात. या शिकवणी वर्गात २५ विद्यार्थी उपस्थित असतात, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. या गावात चांगल्या माणुसकीचे व प्रेमळ लोक असल्याचे प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
पारंपरिक मासेमारी, नावीन्यपूर्ण शेती
या गावातील अशोक वाघ याला उत्कृष्ट शेतकरी म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाकडून गौरविण्यात आले आहे. ‘मुरबाड झिनी’ या कमी लावल्या जाणाऱ्या तांदळाची यशस्वी शेती करून त्याने हा पुरस्कार पटकावला आहे. तर, ‘बुर्दुल’ या पारंपरिक मासे पकडण्याच्या वस्तूसह येथे मासेमारी केली जाते. बंद टोपलीला बांबूचे मुख बसवून झरा अथवा वाहत्या स्रोताजवळ पाण्यात दडवल्याने या बुर्दुलमध्ये मासे अडकतात.