व्यवसायानिमित्त ठाण्यात स्थिरावलेल्या राजस्थानच्या तरूणाकडून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा

उदरनिर्वाहासाठी आपला मुलुख सोडून परप्रांतात स्थायिक झालेल्या प्रत्येकाच्या मनात स्वत:च्या गावाविषयी एक हळवा कोपरा असतो. त्यातून शहरी विभागात ग्रामस्थ मंडळे स्थापून त्यामाध्यमातून गावाकडे काही ना काही प्रकल्प राबविण्याच्या योजना आखल्या जातात. राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्य़ातील करावली या छोटय़ाशा खेडय़ातून ठाण्यात स्थायिक झालेला गंगाराम पटेल हा तरुणही त्याला अपवाद नाही. येथील पाचपाखाडी विभागात रद्दी विक्रीचे काम करणाऱ्या गंगारामने शहरातील ‘गाव’वाल्यांच्या मदतीने तिथल्या ‘सरकारी’ शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळे अगदी काही वर्षांपर्यंत मूलभूत सुविधांचाही अभाव असलेल्या करावलीतील शासकीय विद्यालयाने आता कात टाकली असून उत्तम दर्जाच्या खासगी शाळेइतक्या सुविधा गावातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या आहेत. बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असणाऱ्या या शाळेची विद्यार्थीसंख्या अतिशय रोडावली होती. दोन वर्षांपूर्वी शाळेतील सर्व इयत्ता मिळून अवघे ११२ विद्यार्थी होते. मात्र आता विद्यार्थीसंख्या दुपटीने वाढून २३१ झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक डॉ. विजय चौधरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सर्वसाधारणपणे शहरातील गाववाले गावातील मंदिराचे नूतनीकरण अथवा जीर्णोद्धाराचे काम हाती घेतात. मात्र आठवी इयत्तेपर्यंतच शिक्षण झालेल्या गंगाराम पटेल याला उत्तम दर्जाच्या शिक्षणामुळेच गावातील नव्या पिढीचे भविष्य उज्ज्वल भविष्यासाठी दोन वर्षांपूर्वी शाळेतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुख्याध्यापकांनी गावकऱ्यांना शाळेला मदत करण्याचे आवाहन केले, तेव्हा त्यापासून प्रेरणा घेत गंगारामने ठाणे-मुंबईतील गाववाल्यांशी संपर्क साधला. शाळेच्या जीर्णोद्धारासाठी यथाशक्ती मदत करण्याची विनंती केली. त्याला बहुतेकांनी सक्रिय पाठिंबा दिला. गावात राहणाऱ्या काही सधन व्यक्तींनीही मदत केली. त्यातून सुमारे आठ लाख रुपये जमा झाले. त्यातून सुरुवातीला शाळेच्या आवारात एक कूपनलिका खोदली. त्यावर ऑरो यंत्रणा बसवून विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. शाळेच्या इमारतीची डागडुजी करण्यात आली. रंगरंगोटी करून भिंतींवर चित्रे काढली. आधुनिक काळाला अनुसरून शाळेत स्मार्ट क्लासरूम साकारली. त्यात डिजिटल शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.  याव्यतिरिक्त शाळेत अद्ययावत दहा संगणकाचे कक्षही उभारले असून  ग्रंथालयाचेही नूतनीकरण  केले आहे. शिवाय शाळेच्या आवारात ५०० झाडे लावल्यामुळे करावली पंचक्रोशीत या शाळेचे कौतुक होत आहे.

अपुऱ्या शिक्षणामुळे गावाकडे रोजगार मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे इतरांप्रमाणे मीसुद्धा २००१ मध्ये ठाण्यात आलो. आठवीपर्यंतच शिक्षण असल्याने चांगल्या हुद्दय़ाची नोकरी मिळणे शक्यच नव्हते. त्यामुळे इथे काही काळ छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या केल्यानंतर स्वत:चा रद्दी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. गावातील असुविधा दूर करण्यासाठी आपण काही तरी करावे, असे सारखे वाटत होते. मुख्याध्यापकांनी आवाहन केल्यावर त्या विचारांना चालना मिळाली.

गंगाराम पटेल, रद्दी विक्रेता, पाचपाखाडी

Story img Loader