पूर्वा साडविलकर
शहापूर तालुक्यातील कळभोंडे गावात अद्याप एकाही करोनाबाधिताची नोंद नाही; स्थानिक यंत्रणांच्या नियोजनाचा परिणाम
ठाणे : करोनाच्या पहिल्या लाटेने शहरी भागांना आपल्या कवेत घेतले. दुसऱ्या लाटेचा जोर इतका होता की राज्यातील गावागावांमध्ये करोना पसरला. ठाणे जिल्ह्य़ातील गावे, आदिवासी पाडय़ांमध्येही करोनाचा शिरकाव झाला. ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील कळभोंडे गाव मात्र एका वेगळ्या कारणामुळे गेली दीड वर्षे चर्चेत आहे. दीड-दोन हजारांची लोकसंख्या आणि अधिकाधिक आदिवासी वस्ती असलेल्या या गावात करोना शिरलेलाच नाही. गावातील ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी आखलेल्या नियोजनामुळे हे शक्य झाले आहे.
ठाणे आणि नाशिक जिल्ह्य़ाच्या सीमेवर शहापूर तालुक्यातील कळभोंडे या गावात १९८ आदिवासी कुटुंबांचे वास्तव्य आहे. गावाची नोंदीत लोकसंख्या एक हजार दोन इतकी असली तरी प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षा अधिक असावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गावातील ९५ टक्के कुटुंब स्वत:च्या मालकीच्या किंवा इगतपुरी, जुन्नर परिसरात बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतावर कामे करून आपला उदरनिर्वाह करतात.
मार्च २०२० मध्ये करोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले. प्रत्येक शहरात, गावात मोठय़ा संख्येने करोनाबाधित आढळण्यास सुरुवात झाली. या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने संचारबंदी जाहीर केली. टाळेबंदीचा निर्णय झाला, तेव्हा या गावातील अनेक मजूर दुसऱ्या गावांमध्ये, शहरांमध्ये कामानिमित्त गेले होते. जे बाहेर गेले आहेत त्यांनी गावात येऊ नये, असे निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. या मंडळींनीही गावातील पुढाऱ्यांचे ऐकले आणि बरेच दिवस आहेत तेथेच थांबले. काही काळानंतर अनेक जण परतू लागले. अशा नागरिकांना गावाच्या वेशीवर १४ दिवस विलगीकरणात ठेवले जात होते. त्यासाठी विशेष व्यवस्था केली जात होती. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना गावात प्रवेश दिला जात होता. हा नियम आताही काटेकोरपणे पाळला जात आहे. येथील ग्रामपंचायतने तात्काळ करोना आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली. लोकांची भीती कमी करून करोना होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती ग्रामपंचायतीमार्फत सातत्याने देण्यात येत आहे. मुखपट्टी आणि सॅनिटायझरचे नियमित वापर, वाटप यांकडे लक्ष पुरविले जात आहे. आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या साहाय्याने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येते. हे गाव हातावर पोट असणाऱ्या शेतमजुरांचे आहे. त्यामुळे या काळात उत्पनाचे स्रोत नसल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून काही सामाजिक संस्थांकडून आणि अन्नधान्य वितरण समितीमार्फत येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम करतानाही करोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्व पालन केले जाते. त्यामुळे या नागरिकांचा बाहेरील व्यक्तीशी जास्त संपर्क येत नाही. येथील नागरिक प्रशासनाला उत्तम सहकार्य करत आहेत, अगदी भाजीपाल्याकरिता गावातील नागरिकांनी गावाबाहेर न जाता ग्रामपंचायत हद्दीतील डोंगररांगामध्ये असणाऱ्या रानभाज्यावर आणि घरच्या घरी लागवड केलेल्या भाज्याच खाणे पसंत केले आहे. नागरिकांची सहकार्याची भावना आणि नियम पाळण्याची वृत्ती यांमुळे गावात अद्याप तरी करोना रुग्ण आढळून आलेला नसल्याचे येथील सरपंच देवकी गिरा यांनी सांगितले.
गावच्या भौगोलिक परिस्थितीमुळे या गावात अद्याप करोना रुग्ण आढळलेला नाही. गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला दिलेल्या प्रतिसादामुळे हे शक्य झाले आहे. या गावात आतापर्यंत ५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आतापर्यंत हे गाव करोनामुक्त राहिले आहे. यापुढेही या गावात करोनाचा शिरकाव होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
– प्रशांत मार्के, ग्रामसेवक, कळभोंडे, शहापूर.
ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील कळभोंडे गावातील उपाययोजनांमुळे गावात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे हे गाव सर्वासाठीच आदर्श बनले आहे. ग्रामीण भागातील सर्वच गावांतील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.
– डॉ. भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद