कल्याण – शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील खरवली गावातील एका ग्रामस्थाने एका शेतकरी महिलेचा शेतात काम करत असताना तिचे दागिने लुटून आठ वर्षापूर्वी खून केला होता. या खूनप्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला मोते यांनी संबंधित ग्रामस्थाला जन्मठेप आणि २० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
ही रक्कम सरकारी कोषागारात जमा करून या रकमेतील १९ हजार रुपये मयत महिलेच्या वारसांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मुकेश गणपत निमसे (रा. खरवली) असे जन्मठेप झालेल्या ग्रामस्थाचे नाव आहे. संध्या गणेश निमसे असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. कदंबिनी खंडागळे यांनी न्यायालयात काम पाहिले. ॲड. खंडागळे यांनी न्यायालयाला सांगितले, मयत संध्या गणेश निमसे या ९ ऑगस्ट २०१७ मध्ये आपल्या खरवली गावाजवळील शेतात भातशेतीचे काम करत होत्या. पावसाचे दिवस होते. संध्या निमसे शेतात एकटया काम करत होत्या. त्यांच्या गळ्यात सोन्याचा ऐवज होता.
हा ऐवज हिसकावण्याच्या उद्देशाने आरोपी मुकेश निमसे हा संध्या मजुरी करत असलेल्या शेतात आला. त्याने संध्या यांच्याजवळ येऊन अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्याचा प्रयत्न केला. संध्या यांनी तीव्र प्रतिकार केला. यावेळच्या झटापटीत मुकेश यांनी संध्या यांच्या जवळील सोन्याचा ऐवज हिसकावून त्यांची हत्या केली.
याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात संध्या निमसे यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मुकेश निमसे याला याप्रकरणात अटक केली होती. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी खटला दाखल झाला होता.
याप्रकरणात न्यायालयाने सर्व सबळ पुरावे, १३ साक्षीदार तपासून संध्या निमसे यांच्या खुनाला मुकेश हेच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढत मुकेश निमसे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. किन्हवली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी याप्रकरणाचा कसून तपास केला होता.