तीन महिन्यांपासून खोदलेल्या खड्ड्यांविरूद्ध ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाची तयारी

उल्हासनगरः कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाच्या संथगती कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थआणि प्रवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. त्यातच येथील रस्त्याशेजारी नाले उभारणीच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले होते. मात्र नाल्याचे काम रखडल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. या नाल्यात पडून अपघात होण्याची भीती असून त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिक सेक्रेड हार्ट शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विकास कामांचे लोकार्पणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी कल्याणमध्ये

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या गावातील ग्रामस्थ आणि येथून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला. मात्र तुकड्या तुकड्यांमध्ये सुरू असलेल्या या रस्तेकामामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. सुरूवातीच्या कंत्राटदाराच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे येथे अनेक अपघात झाले. अनेक वाहनांचे नुकसान यात झाले असून ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. तर तीन जणांना जीवही गमवावा लागला. याच दरम्यान कंत्राटदार काम करण्यास सक्षम नसल्याने या कामासाठी आणखी एका कंत्राटदाराला काम देण्याचे ठरले. आता या दोन कंत्राटदारांमध्ये समन्वय नसल्याचे समारे आले आहे. त्याचाही फटका प्रवाशांना आणि ग्रामस्थांना बसतो आहे. या रस्त्याच्या कडेला नाले उभारण्यासाठी खड्डे खोदण्यात आले होेते. मात्र तीन महिने उलटूनही नाले न बनवल्याने स्थानिकांनाच प्रवास खडतर झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि दुकानदार यांना चालणेही अवघड झाले आहे. या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पडून अपघात होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविरूद्ध स्थानिक सेक्रेड हार्ट शाळेच्या वतीने हे काम तातडीने पूर्ण न केल्यास २० फेब्रुवारी रोजी खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे तीन महिन्यानंतरही खड्डे जैसे थे असल्याने ग्रामस्थ हैराण झाल्याचे स्थानिक अश्विन भोईर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> ठाणे : कळव्यात मोटारीने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांना संपर्क केला असता, कंत्राटदारांमध्ये समन्वय असून येत्या एक ते दोन दिवसात येथील नाल्यांच्या कामांना सुरूवात केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. मात्र संपूर्ण कामच वेळेत का सुरू केले जात नाही, असा प्रश्न आता ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जातो आहे. चौकटः या रस्ते कामातील हलगर्जीपणाचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारातही पोहोचला होता. त्यांनी कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना समज देत हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमध्ये गांभीर्य नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers aggressive over slow work of kalyan ahmednagar national highway zws