लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : जुनी डोंबिवलीत कल्याण डोंबिवली पालिकेकडून शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प अलीकडेच पालिकेच्या घनकचरा विभागाने सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरेल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, असे प्रश्न करत जुनी डोंबिवलीतील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. बुधवारी या प्रकल्पाच्या ठिकाणी जमवून ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शवला.
या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी बुधवारी सकाळी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड येणार असल्याची माहिती मिळाल्यावर जुनी डोंबिवलीतील ग्रामस्थ शास्त्रोक्त कचरा प्रकल्प प्रकल्प स्थळी जमा झाले होते. शंभर टन क्षमतेचा (टीपीडी) कचरा विल्हेवाट प्रकल्प जुनी डोंबिवलीत उभारण्यात आला आहे. कल्याण, डोंबिवली शहरांची वाढती लोकवस्ती, नागरिकरणाचा विचार करून पालिकेने त्या प्रभागातील कचरा त्या भागातच विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले आहे. यामुळे कचऱ्याची वाहतूक, मनुष्यबळ, इंधन बचत होणार आहे. या प्रकल्पाच्या आजुबाजुला स्थानिकांच्या जमिनी, निवासी वस्ती आहे. हा प्रकल्प योग्य नियोजनाने चालविला नाहीतर या भागात दुर्गंधी पसरेल. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली.
आणखी वाचा-विधानसभेतले बंडखोर पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर?
पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड प्रकल्प स्थळी आल्यावर त्यांनी जुनी डोंबिवलीतील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. आयुक्त डॉ. जाखड यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पाची उभारणी केली आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी या प्रकल्प स्थळाच्या आवश्यक तपासण्या करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या काही अडचणी असतील तर त्यांच्या समस्या ऐकून घेण्यास प्रशासन तयार आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता नागरिकंनी चांगल्या विकास कामात अडथळा आणू नये.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा प्रकल्प राबविण्याच्या आरक्षित भूखंडावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाणार आहे. शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे योग्य नियोजन करणे पालिकेला शक्य होणार आहे. येणाऱ्या काळात हा प्रकल्प अधिकधिक अत्याधुनिक पध्दतीने चालविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी सांगितले. ग्रामस्थांनी या प्रकल्पासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ४ जानेवारी रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे.
आणखी वाचा-“…तर आम्हीही फोडाफोडी करू शकतो”, भाजप नगरसेवकाच्या शिवसेना प्रवेशानंतर आमदार कथोरे आक्रमक
नागरिकांनी विकास कामांना विरोध न करता शहराच्या प्रगतीचा विचार करून सकारात्मक दृष्टीकोनातून प्रकल्पाकडे पाहावे. जुनी डोंबिवलीतील प्रकल्पाविषयी पालिका ग्रामस्थांचे म्हणणे, त्यांच्या सूचना ऐकून योग्य मार्ग काढण्यास तयार आहे. -डॉ. इंदुराणी जाखड, आयुक्त.