महापालिकेने डायघर भागात उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ पुन्हा एकवटले आहेत. या ग्रामस्थांनी शुक्रवारी प्रकल्पस्थळी धरणे आंदोलन करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. ठाणे शहराबाहेरील म्हणजेच भांडर्ली कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला हा प्रकल्प बंद करत पालिकेने डायघर भागात घनकचरा प्रकल्प सुरू केला आहे. याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता.
हेही वाचा >>> संसद घुसखोरी प्रकरणी कल्याणमधील फटाके विक्रेत्यांची चौकशी
दरम्यान, ग्रामस्थांना प्रकल्पाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु पालिकेकडून प्रात्यक्षिक दाखविण्यात आलेले नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रकल्पास विरोध दर्शविला आहे. हा घनकचरा प्रकल्प रद्द व्हावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये माजी नगरसेवक हिरा पाटील, माजी नगरसेवक संतोष केणे, महेश पाटील, संतोष पाटील, रवी पाटील, योगेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. डायघर कचरा प्रकल्पामुळे नागरिकांना कशाप्रकारे दुर्गंधीला सामोरे जावे लागते, ही बाब माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. तसेच जनहित याचिका दाखल करण्यासाठी त्यांनी वकिलांना घेऊन या जागेची पाहणी केली.