ठाणे – गावातून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात जायचे म्हटले तर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय नाही. त्यामुळे मोठ्या आजाराच्या तपासणीसाठी रुग्णालयात जाणे परवडत नाही. पण, आज गावात पहिल्यांदाच कर्करोग निदाणासाठी फिरते तपासणी केंद्र (मोबाईल बस) च्या माध्यमातून सर्व डॉक्टरांची टीम आल्यामुळे बरे वाटते आहे, अशी समाधानकारक प्रतिक्रिया शहापुरमधील आवाळे गावातील पार्वती भल्ला या वयस्कर महिलेने व्यक्त केली.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेले वीस दिवसांपासून कर्करोग निदानासाठी ही बस फिरत असून या बसच्या माध्यमातून नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय कर्करोगाची तपासणी केली जात आहे. या तपासणीमार्फत जिल्ह्यात मुख कर्करोगाचे २२ तर, गर्भाशय कर्करोगाचे १२ आणि स्तन कर्करोगाचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. शहापुर तालुक्यातील आवळे गावात या कर्करोग मोबाईल बसचा शेवटचा दिवस होता, आता ही बस रायगड आणि पालघर जिल्ह्यातून पुन्हा दोन महिन्याने ठाणे जिल्ह्यात येणार आहे.

शहापुर तालुक्यातील आवाळे गावात शुक्रवारी सकाळी कर्करोग मोबाईल बस पोहोचली आणि बसजवळ गावातील नागरिकांची गर्दी जमली. जिल्हा शल्यदंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी सुरुवातीला सर्व नागरिकांना या बसचे महत्त्व, त्या बसमध्ये कोणत्या तपासण्या होतील याची माहिती दिली. त्यानंतर, नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. या गावातील ३९ नागरिकांची मुख कर्करोगाची तपासणी सुरुवातीला करण्यात आली. त्यानंतर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अविनाश बढिये यांनी २८ महिलांची स्तन कर्करोग आणि २८ महिलांची गर्भाशय कर्करोगाची तपासणी केली. ज्या रुग्णांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आली त्यांना पुढील उपचाराचा सल्ला देण्यात आला.

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना समजले की, गावातून उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. एखाद्या रुग्णाला तात्काळ रुग्णालयात घेऊन जायचे असेल तर, खूप हाल होत असल्याची प्रतिक्रिया गावातील मंजू सुतार यांनी दिली. तर, गावातील गरोदर महिलांनाही दर महिन्याच्या सोनोग्राफीसाठी उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते. गावातून रिक्षा किंवा इतर वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे एक तास पायी चालत जाऊन मग रिक्षा मिळते, अशी प्रतिक्रिया काही गरोदर महिलांनी दिली.

ग्रामीण भागात असलेल्या या गैरसोयीमुळे येथील नागरिकांना तात्काळ उपचार मिळत नाही, अशावेळी त्यांच्या आजारात आणखी वाढ होत असते. किंवा दुर्देवी मृत्यूही होतो. गावपाड्यातील नागरिकांची ही गैरसोय थांबावी त्यांना तात्काळ उपचार मिळावे, वैद्यकीय सल्ला मिळावा यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात ही कर्करोग मोबाईल बस सुरु करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात ११ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत विविध गाव-पाड्यांमध्ये ही बस पोहोचली. दिवसाला १०० ते १५० नागरिकांची या बसमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली.

शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी तालुक्यात विविध गाव-पाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उप आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कर्करोग मोबाईल बस पोहोचत होती. त्याठिकाणी बसमध्ये नागरिकांची तपासणी केली जात होती. ११ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ८५१ नागरिकांची मुख कर्करोगाची, ५४९ महिलांची स्तन कर्करोगाची आणि २७७ महिलांची गर्भाशय कर्करोगाची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२ रुग्णांना मुख कर्करोगाची लक्षणे आढळून आली. तर, तीन महिलांना स्तन आणि १२ महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य दंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली. तसेच ही बस दोन महिन्या नंतर पुन्हा ठाणे जिल्ह्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader