लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली – येथील घरडा सर्कल भागात महावितरणच्या उच्च दाब वीज वाहिनीवर रानवेलींचा विळखा पडला आहे. या वेली महावितरणच्या एका खांबावरील वीज वाहिनींवरून रस्त्यांवरून दुसऱ्या खांबावर गेल्या आहेत. उंच अवजड वाहन याठिकाणाहून जाताना वेलींचा झुबका वाहनाला अडकून मोठा अपघात याठिकाणी शक्यता स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
वाहनाचा उंचवटा भाग वीज वाहिन्या आणि वेलींना अडकला तर शॉर्टसर्किट होऊन भीषण अपघात याठिकाणी होण्याची, तसेच वाहनाला, त्यामधील चालक, सेवकाला गंभीर इजा होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वीज वाहिनीला वेलींचा विळखा पडला आहे. या वेलींमुळे उच्च दाब वीज वाहिन्यांना झोल पडून त्या रस्त्याच्या दिशेने खाली वाकल्या आहेत.
आणखी वाचा-डोंबिवलीत किराणा दुकानात विमल पान मसल्याची विक्री, देवी चौकातील दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल
उंच अवजड मालवाहू वाहन या वीज वाहिन्यांखालून नेताना चालकाला कसरत करावी लागते. रात्रीच्या वेळेत वीज वाहिन्यांचा वेलींचा विळखा पडलेला झोल वाहन चालकाच्या लक्षात आला नाही तर वीजेचा खांब जिवंत वीज वाहिन्यांसह वाहनाला अडकून फरफटत जाण्याची शक्यता आहे. यामुळे याठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन अपघात होण्याची शक्यता आहे.
या वीज वाहिन्यांच्या बाजुला टायरची दुकाने, रुग्णालये, हॉटेल्स, व्यापारी दुकाने आहेत. त्यामुळे काही अपघात होण्यापूर्वीच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज वाहिनीला पडलेला वेलींचा विळखा काढून टाकण्याची मागणी घरडा सर्कल भागातील व्यापारी, रहिवाशांकडून केली जात आहे.