Vinod Kambli Health Update: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे मित्र विनोद कांबळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजारी आहेत. भिवंडीतील आकृती रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांच्या आजारपणाविषयी वृत्त जाहीर होताच त्यांना भेटण्यासाठी क्रीडा व राजकीय वर्तुळातून अनेक मान्यवर रुग्णालयात जात आहेत. रुग्णालयातून विनोद कांबळी यांनी यासंदर्भात माध्यमांशी साधलेल्या संवादातून आपल्या चाहत्यांना संदेश दिला आहे. दरम्यान, विनोद कांबळी यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून लवकरच त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डच्या खोलीत हलवलं जाणार असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

विनोद कांबळी यांना जवळपास दोन आठवड्यांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयातर्फे त्यांच्यावर आजन्म मोफत उपचार केले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्याशिवाय त्यांच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीवर उपाय म्हणून व्यापक प्रमाणावर आर्थिक मदतीचं आवाहन केलं जात आहे. याला मिळालेल्या प्रतिसादातून जवळपास ३० लाख रुपये जमा करण्यात येऊन ते कांबळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

विनोद कांबळींचं आवडतं गाणं..जीना यहाँ, मरना यहाँ!

दरम्यान, रुग्णालयात टीव्ही ९ शी बोलताना विनोद कांबळी यांनी उपचार व्यवस्थित होत असल्याची माहिती दिली. “डॉक्टरांनी चांगली ट्रीटमेंट दिली आहे. मला त्यांनी फिजिओथेरेपी चालू केली आहे. त्यामुळे मी थोडं थोडं चालू शकतोय. मी एवढंच सांगेन, मी लवकरच परत येईन. सगळ्यांचं आमच्या कुटुंबावर प्रेम आहे. सगळ्यांना माझ्याकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा”, असं विनोद कांबळी म्हणाले. सचिन तेंडुलकर आणि माझे सोबत क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम आहेत. सचिन भारतरत्न आहे, असंही विनोद कांबळी आपल्या मित्राबाबत म्हणाले.

“लवकरच मी धावायला सुरुवात करेन”

विनोद कांबळींनी त्यांच्यावरील उपचारांची माहिती देताना लवकरच आपण बरे होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. “माझी फिजिओथेरेपी संपली की मी लवकरच धावायला सुरुवात करेन”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी “कल खेल में हम हो ना हो.. गर्दिश में तारे रहेंगे सदा..भूलोगे तुम, भूलेगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा.. रहेंगे यहीं अपने निशान, इस के सिवा जाना कहा.. जीना यहाँ, मरना यहाँ इसके सिवा जाना कहा”, या आपल्या आवडत्या गाण्याच्या ओळीही निर्धारपूर्वक म्हणून दाखवल्या.

Story img Loader