ठाणे- लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून वातावरण सध्या तापले आहे. येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभने दाखविण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील सावरकर नगर भागात आचारसंहितेचा भंग करून मतदारांना विविध योजनांचे प्रलोभन दाखवून त्याच्याकडून त्या योजनांचा अर्ज भरून घेण्याचे काम शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
देशभरात १९ एप्रिल ते १ जून दरम्यान लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका होणार असून पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतु तरी देखील अनेक ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. ठाणे शहरात आचारसंहिता लागू होताच, शहरातील राजकीय नेत्यांचे बॅनर काढण्यात आले होते. परंतु, असे असले तरी काही राजकीय मंडळींकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जात असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग
ठाणे शहरातील मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट भागातील सावरकरनगर परिसरात मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना (शिंदे गटाच्या) पदाधिकाऱ्यांकडून केंद्र सरकारच्या योजनांचा आधार घेतला जात आहे. विशेष करून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांचे अर्ज या परिसरात भरून देण्याचे काम केले जात आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – बच्चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?
ठाकरे गटाचा टोला
आजपर्यंत कोणत्याही योजना यशस्वी झाल्या नाहीत. परंतु, आता मतासाठी हा प्रकार जाहीरपणे चालू आहे. नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. मात्र, तरी देखील काहीजणांकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यावर निवडणूक आयोग कारवाई करेल का असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
हेही वाचा – दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप
नियम हे सर्वांना सारखेच असतात, परंतु काही ठराविक लोकप्रतिनिधी हे नियम मोडण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे असून त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. – राजीव शिरोडकर, विभागप्रमुख (ठाकरे गट) सावरकर नगर.