कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करत विपुल चौहाण याने सात जणांची सुमारे दोन लाख ३० हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली. कोकणीपाडा भागात राहणारे विवेक गवळी आणि त्याच्या मित्रांची फसवणूक झाली आहे. कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करत विपुलने त्यांच्याशी ओळख वाढवली. कस्टममध्ये पकडलेले सोने हे एक महिन्याच्या आत त्याच्या मालकाने सोडवून नेले नाही तर ते कस्टमकडे जमा होते. त्यानंतर त्याचा लिलाव होतो. त्यामध्ये पैसे लावले तर ते दुप्पट होतात, असे त्याने सांगितले. या भूलथापांना बळी पडत विवेक आणि त्याचे मित्र जयेश धागड, योगेश धांगड, हरीश जाधव, दयालकुमार परिहार, बगाराम परिहार, राजू प्रजापती यांनी त्याच्याकडे दोन लाख ३० हजार रुपये दिले. मात्र, पैसे दुप्पट होत नाहीत आणि दिलेले पैसेही परत मिळत नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सात जणांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.