विरारमध्ये गणेश कोलटकर यांची तुकडे करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या पिंटू शर्माने अरविंद रानडे यांची देखील अशाच पद्धतीने हत्या केल्याचा आरोप रानडे कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी रानडे बेपत्ता झाल्यावर पिंटू शर्माला अटकही केली होती. मात्र, चौकशीतून काहीच निष्पन्न न झाल्याने पोलिसांना शर्माला सोडून द्यावे लागले होते.
मीरा रोड येथील पिंटू शर्माने त्याचा मित्र गणेश कोलटकर (५८) यांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीनशे तुकडे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पिंटू शर्मा पोलिसांच्या कोठडीत आहे. मागील वर्षी नायगाव येथून बेपत्ता असलेले विमा अधिकारी अरविंद रानडे यांच्या बेपत्ता होण्यामागे पिंटू शर्माचाच हात असल्याचा आरोप रानडे कुटुंबीयांनी केला आहे.
अरविंद रानडे हे विमा अधिकारी होते आणि बोरिवलीच्या आयसी कॉलनीत रहात होते. पिंटू शर्मा हा त्यांच्याकडे विमा एजंट म्हणून कामाला होता. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी अरविंद रानडे हे पिंटू शर्मासोबत नायगावला गेले होते. तेव्हापासून रानडे बेपत्ता आहेत. १५ मार्च रोजी वालीव पोलिसांनी रानडे यांच्या अपहरण प्रकरणात पिंटू शर्मा याला अटक केली होती. मात्र तपासात काहीच निष्पन्न झाले नव्हते. त्यानंतर पिंटू जामिनावर सुटला होता.
रानडे यांचे बंधू श्रीनिवास पटवर्धन यांनी अरविंद रानडे यांची हत्या पिंटू शर्माने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. ज्या पध्दतीने विरारमध्ये कोलटकर यांची हत्या झाली त्याच पध्दतीने रानडे यांचीही हत्या केली गेली असावी, असे ते म्हणाले.
भाड्याचा फ्लॅट हा समान दुवा
पिंटू शर्माने गणेश कोलटकर यांची हत्या देखील विरारमध्ये भाड्याचा फ्लॅट घेऊन केली होती, याकडे रानडे कुटुंबीयांनी लक्ष वेधले आहे. पिंटू शर्मा रानडे यांना नायगाव येथील एका इमारतीत घेऊन गेला होता. त्या इमारतीमधील फ्लॅट शर्मा याने भाड्याने घेतला होता, याकडे पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला तर बेपत्ता रानडे यांचे नेमके काय झाले ते सुध्दा उघड होईल, असे पटवर्धन यांनी म्हटले आहे. यानंतर आता पोलीस रानडे प्रकरणात नव्याने चौकशी करणार आहेत.