Vishal Gavli MLA Sulbha Gaikwad : डिसेंबर २०२४ मध्ये कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तळोजा तुरुंगात कैद असलेल्या विशाल गवळी याने रविवारी (१३ एप्रिल) सकाळी कारागृहातील बराकीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लैंगिक अत्याचार करून बालिकेची हत्या करणाऱ्या विशालला फाशी द्या, या मागणीसाठी अत्याचाराच्या घटनेनंतर दोन महिने नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. मात्र, न्यायालयाने विशालला शिक्षा ठोठावण्याआधीच त्याने आयुष्य संपवलं आहे.
दरम्यान, या घटनेवर स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गायकवाड म्हणाल्या, “त्या (बलात्कार) घटनेनंतर कल्याणमधील लोकांनी जागोजागी होर्डिंग लावून आरोपीला फाशी द्या अशी मागणी केली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनसामान्यांकडून होत होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सांगितलं की हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवलं जाईल आणि जास्तीत जास्त तीन ते चार महिन्यांत आरोपीला फाशी होईल.
“मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हा खटला ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दोन ते तीन महिन्यांत या प्रकरणी निकाल लागून आरोपीला शिक्षा होणार होती. त्याआधीच त्याने आत्महत्या केली,”
पीडित कुटुंबाला न्याय मिळाला : आमदार सुलभा गायकवाड
आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या, “आरोपीला फाशी होणार होती याची त्याला कल्पना असल्यामुळेच त्याने आज आत्महत्या केली. हे वृत्त ऐकून आम्हाला न्याय मिळाला आहे असं वाटतंय. आरोपीने भीतीपोटी आत्महत्या केली. तुरुंगात असताना फाशी लावून घेतली. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे, असं आम्हाला वाटतंय.
न्यायालयाकडून शिक्षा व्हायला हवी होती : गायकवाड
भाजपा आमदार म्हणाल्या, “आरोपीने स्वतःहून फशी लावून घेतली हे चांगलं झालं. परंतु, न्यायालयाने याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावली असती आणि नंतर त्याला फाशी झाली असती तर बरं झालं असतं. परंतु, पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे अशी भावना आमच्या मनात आहे. हल्ली अनेक ठिकाणी असे गुन्हे घडत आहेत त्यामुळे विशाल गवळीसारख्या आरोपीला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा झाली असती तर अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली असती.”