कल्याण : येथील चक्कीनाका भागातील एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या विशाल गवळीला अधिकच्या चौकशीसाठी ठाणे, कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. विशालची योग्यरितीने विनाविलंब चौकशी करता यावी. त्याला यापूर्वी आणि आता केलेल्या घटनांच्या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यासाठी झटपट नेता यावे यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी विशाल गवळीला डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवले आहे.
विशाल गवळीने केलेल्या बालिकेच्या हत्येविषयी कल्याण परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष या घटनेचा निषेध करण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चे आणून विशाल गवळीला फाशीची शिक्षा किंवा त्याला लोकांच्या ताब्यात देण्याची मागणी करत आहेत. विशाल आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या विषयी लोकांच्या भावना तीव्र आहेत. काही जागरूक नागरिक कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विशालवर कठोर कारवाई करावी म्हणून निवेदने घेऊन येत आहेत.
कोळसेवाडी पोलीस ठाणे या सगळ्या हालचालींमुळे गजबजलेले असते. इतर अन्य तक्रारी करण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात येतात. अशा सतत वर्दळीच्या वातावरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत विशाल गवळीची चौकशी करण्यात काही अडचणी, अडथळे येण्याची शक्यता विचारात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विशाल गवळीला सुरक्षित पोलीस कोठडी म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवले आहे.
विशालवर यापूर्वी जबरी चोरी, विनयभंग, मारहाण प्रकरणी एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. अशाच एका प्रकरणात यापूर्वी तो अटक होता. नंतर जामिनावर सुटून तो काही महि्न्यापूर्वी बाहेर आला होता. विशालने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी, त्यावेळी झालेला त्या गुन्ह्यांचा तपास, विशालची अभिलेखावर नसलेली पण इतर काही गैरकृत्ये, बालिकेला विशालने तिच्या घराच्या परिसरातून कोणते कारण देऊन आणले. बालिकेची हत्या करण्यापूर्वी विशालने तिच्याशी केलेला संवाद, बालिकेने हत्येपूर्वी केलेला प्रतिकार, विशालने यापूर्वी मनोरुग्ण असल्याचा दाखला दाखवून न्यायालयातून जामीन मिळविल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली. हा दाखला कोणत्या मनोविकार तज्ज्ञाने दिला. तो देण्यासाठी विशालची मानसिक स्थिती काय होती.
बालिकेची घरात हत्या केल्यानंतर विशाल कामावरून घरी परतलेल्या पत्नीला दिलेली हत्येची माहिती. पत्नीने पती विशालला दिलेला सल्ला. बालिकेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी करण्याच्या हालचाली, मृतदेह फेकून दिल्यानंतर विशाल कल्याणमधून बुलढाणा जिल्ह्यातील शेगावपर्यंत कसा पोहचला. तो या प्रवासात कोठे थांबला. शेगाव येथे वेश पालटून तो कोठे पळण्याच्या प्रयत्नात होता, अशा अनेक बाजुने तपास अधिकाऱ्यांना विशालची चौकशी करायची आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.