कल्याण – कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका बालिकेवर राहत्या घरात लैंगिक अत्याचार करून नंतर तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या कुख्यात विशाल गवळीने रविवारी पहाटे तळोजा कारागृहातील स्वच्छतागृहात टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या सर्व प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून विशालचा मृतदेह तळोजा कारागृहातून मुंंबईत जे. जे. रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर तेथून पोलीस बंदोबस्तात विशालचा मृतदेह सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याणमधील विठ्ठलवाडी स्मशानभूमीत आणण्यात आला. तेथे त्याच्यावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशालने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला मिळाली. जैसी करणी, वैसी भरणी, या न्यायाने परमेश्वरानेच त्याला शिक्षा दिली, अशी प्रतिक्रिया मृत बालिकेच्या वडिलांनी माध्यमांना दिली. मृत बालिका आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला, अशाच प्रतिक्रिया दिवसभर विशालच्या मृत्यूनंतर विविध स्तरातून उमटत होत्या.
विशालने तळोजा कारागृहात आत्महत्या केल्यानंतर ही माहिती पहिले कारागृह प्रशासनाकडून स्थानिक खारघर पोलीस ठाणे, त्यानंतर विशालच्या कल्याणमधील कुटुंबीयांना सकाळच्या वेळेत देण्यात आली. काही न्यायिक अधिकाऱ्यांकडून कारागृहात विशालने आत्महत्या कशाप्रकारे केली. त्याची कोठडी ते स्वच्छतागृहा दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रण याची माहिती घेतली. या प्राथमिक तपासणीनंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुरुंग प्रशासनाने विशालचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात मुंबईत जे. जे. रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला होता.
बदलापूरमध्ये एका शाळेतील बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार बदलापूर परिसरातील स्मशानभूमीत, मातीत करू नयेत अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली होती. अनेक दिवस अक्षयचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीच्या जागे अभावी रखडले होते. अखेर उच्च न्यायालयाला अंत्यसंस्काराच्या जागेसाठी याप्रकरणात हस्तक्षेप करावा लागला होता. तसा प्रकार विशाल गवळीच्या बाबतीत घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने विशेष गुप्तता बाळगली होती. विशालचा मृतदेह शवविच्छेदन करून कल्याणमध्ये कधी आणला जाईल, याची कोणतीही माहिती पोलीस, रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत नव्हती.
विशालचा मृतदेह कल्याणमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणला. त्याचवेळी काही नागरिकांना कल्याणमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करून देण्यास विरोध केला असता तर कुटुंबीयांसह पोलिसांसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला असता. त्यामुळे माध्यमांसह नागरिकांनाही विशाल गवळीचा मृतदेह कल्याणमध्ये मुंबईतून कधी आणला जाईल याची कोणतीच माहिती देण्यात येत नव्हती. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास विशालचा मृतदेह विठ्ठलवाडी स्मशानभूमीत आणला जाईल, असे त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मुंबईतील रुग्णालयाकडून कळविण्यात आले.
कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ स्मशानभूमी भागात अनुचित प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त लावला. मध्यरात्रीच्या सुमारास विशालच्या मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला होता. विशालवर अंत्यसंस्कार होईपर्यंत पोलिसांना विरोधाची चिंता भेडसावत होती.