लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकरी विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी यांना गुरुवारी पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठीडीची आठ दिवसांची मुदत संपल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पीडित कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार यांनी माध्यमांना सांगितले, विशाल सह त्याच्या पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशाल गवळीच्या वकिलांनी न्यायालयासमोर विशालसह पत्नीची कोणतीही चौकशी शिल्लक नाही. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी. तसेच बदलापूर अत्याचार प्रकरणासारखे याही प्रकरणात विशालसह त्याच्या पत्नीचा पोलीस चकमकीत मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली. हा सर्व घटनाक्रम विचारात घेऊन विशालला त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहण्याची मागणी विशालच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली. पण कायद्यात अशी कोठेही तरतूद नाही, असे पीडित कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार यांनी हरकत घेऊन न्यायालयाला सांगितले. विशालला न्यायालयीन कोठडी देण्यास पीडीत कुटुंबीयांच्या वकिलांनी विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून विशाल, साक्षी गवळी यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आणखी वाचा-ठाणे : थकबाकी असलेल्या अडीच हजार नळ जोडण्या महापालिकेकडून खंडित
विशाल गवळीचे वकील ॲड. संजय धनके यांनी माध्यमांना सांगितले, विशालसह पत्नीला दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आम्ही न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. याप्रकरणाचा बहुतांशी तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणात पोलिसांना विशालचे सीमकार्ड, त्याने गटारात फेकून दिलेला मोबाईल, खाडीत फेकून दिलेली पिशवी यांचा शोध घ्यायचा आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मयत बालिकेची विजार, बालिकेचा मृतदेह फेकून दिलेल्या कल्याण पूर्व ते बापगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात बदलापूर प्रकरणासारखा चकमकीचा प्रकार होऊ नये म्हणून विशाल पोलीस कोठडीत आहे, तोपर्यंत त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असू द्यावेत अशी मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली नाही.
आणखी वाचा-कुटुंब नियोजनावर ‘पुरुष मौन’! कुटुंब नियोजन जनजागृती पंधरवड्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ‘शून्य’
फाशीची मागणी
विशाल गवळीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात गुरूवारी हजर केले जाणार असल्याची माहिती विविध स्तरातील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांना मिळाली होती. कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळपासून कल्याण न्यायालयासमोरील रस्त्यावर शांतेत एक मानवी साखळी केली होती. या कार्यकर्त्यांच्या हातात विशाल गवळीला फाशी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. या मानवी साखळीत महिला, पुरूष, तरूण, तरूणी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
काँग्रेसचे प्रदेश नेते नवीन सिंग आणि इतर पदाधिकारी या मानवी साखळीत सहभागी झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून न्यायालया बाहेर आणि न्यायालय आवारात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.