ठाणे : कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्याला बुलढाणा येथून ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी रात्री उशीरा नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. घटनेमुळे कल्याण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याने रेल्वे मार्गे बुलढाणा गाठल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण येथील अल्पवयीन मुलीला विशाल गवळी याने राहत्या घरात हत्या केली. हत्येनंतर त्याची पत्नी साक्षी घरी आली. विशालने तिला घरात घडलेली घटना सांगितली. विशालने पत्नी साक्षीच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. घरात पडलेले रक्त दोघांनी साफ केले. त्यानंतर त्याने रिक्षा चालक मित्राला संपर्क साधून घरी बोलाविले. मृतदेह असलेली बॅग रिक्षेत ठेवण्यात आली. पत्रीपूल मार्ग आधारवाडी, गांधारी पुलावरून विशाल, साक्षी आणि रिक्षा चालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडघा दिशेने निघाले. बापगाव भागात अंधार तेथे कोणीही आजुबाजुला नाही. वाहनांची वर्दळ नाही पाहून विशालने मृतदेह बापगाव कबरस्तान भागातील जंगली झुडपे असलेल्या भागात फेकला. तेथून ते तातडीने निघाले. विशालने आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्य खरेदी केले. तेथून तो तात्काळ त्याने आपल्या पत्नीचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावी रेल्वेने निघून गेला. पोलिसांनी त्याला बुलढाण्यातून अटक केली. रात्री उशीरा त्याला ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याला आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.