Vishal Gawli : कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान याआधीही त्याने असं कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. एका मुलीवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती मुलगी विशाल गवळीच्या तावडीतून सुटली. या मुलीच्या आईने हा प्रसंग सांगितला आहे.
पीडितेच्या आईने नेमकं काय सांगितलं?
“मी त्यादिवशी कल्याणहून मुंबईला गेली होती. माझे मिस्टर आणि माझा मुलगा घरी होते. माझी मुलगी कॉलेजला गेली होती. तिला बरं वाटत नव्हतं म्हणून ती लवकर घरी आली. ती घरी परतत असताना विशाल गवळीने मागून आला त्याने तिचं तोंड दाबलं आणि तिला ओढून घेऊन जाऊ लागला. ती कशीबशी विशाल गवळीच्या तावडीतून सुटली आणि घरी आली. मी घरी आल्यानंतर मला हे सगळं कळलं. त्यावेळी आम्ही पोलिसात तक्रार केली. ज्यानंतर विशाल गवळीला तुरुंगात ठेवण्यात आलं. दोन महिन्यांनी तो सुटला. आमच्याकडून सगळं लेखी वगैरेही घेतलं होतं. मी कोर्टातही गेले होते. दोन महिन्यांनी तो सुटला. पुढे काय घडलं ते आम्हाला काहीही समजलं नाही.” असं पीडितेच्या आईने सांगितलं.
हे पण वाचा- Kalyan Murder Case Timeline: विशाल गवळीने घरात अत्याचार करून केली चिमुकलीचे हत्या, पत्नीचीही मदत
विशाल गवळीची कल्याण पूर्व भागात दहशत
विशाल गवळीची या परिसरात दहशत आहे असंही या पीडितेच्या आईने सांगितलं. विशाल गवळी मारहाण करणं, धमक्या देणं, मुलींची छेडछाड करणं, शिवीगाळ करणं हे सगळं तो करतो. जी घटना समोर आली आहे त्यामुळे आणखी भीती वाटते. या भागातल्या महिलाही घाबरल्या आहेत. असं पीडितेच्या आईने सांगितलं.
विशाल गवळीला बुधवारी करण्यात आली अटक
विशाल गवळीला बुधवारी शेगावमधून अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी सकाळी कल्याणमध्ये आणण्यात आलं. सुरुवातीला तो ठाणे क्राईम ब्रांचच्या ताब्यात होता, त्यानंतर त्याला कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी त्याला कल्याण कोर्टात हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
१३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या
विशाल गवळीने कल्याणमधल्या एका १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. विशाल गवळी शेगावला पळून गेला होता. त्यालाही बुधवारी अटक करण्यात आली. लैंगिक अत्याचारानंतर या मुलीला ठार करण्यात आलं आणि तिचा मृतदेह कल्याणजवळच्या बापगाव या ठिकाणी फेकण्यात आला. या घटनेने कल्याण हादरलं. आरोपीला अटक झाल्यानंतर आता तो ज्या भागात राहतो त्याच भागातील एका महिलेने तिच्या मुलीबरोबरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न विशाल गवळीने केला होता असं सांगितलंं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महिलेने ही सगळी घटना सांगितली. ही घटना २०२३ मधे घडली होती.