कल्याण : बालिकेची निर्घृण हत्या करणाऱ्या विशाल गवळीला कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाकडून कठोरात कठोर शिक्षा झाली असती तर अशाप्रकारची कृत्य करणाऱ्या इतरांना तो संदेश गेला असता. विशालसंंदर्भात न्यायालयाचा कठोर निर्णय महत्वाचा होता. तत्पूर्वीच त्याने आत्महत्या केली असली तरी, त्याने जे क्रूर कृत्य केले होते. त्याची शिक्षा त्याला परमेश्वराने दिली आणि मृत बालिकेसह तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला, अशा प्रतिक्रिया कल्याण, डोंबिवलीतील राजकीय क्षेत्रातील मंडळींनी दिल्या.
कल्याण पूर्वेत बालिकेची हत्या झाल्यानंंतर या गुन्ह्यातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयात हा खटला चालविणे, या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्जवल निकम यांची नियुक्ती, या प्रकरणाच्या पोलीस तपासात कोठेही त्रृटी राहणार नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारीक लक्ष होते. हा खटला गती घेत असताना आरोपीने आत्महत्या केली. याप्रकरणातील मृत बालिकेसह तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.सुलभा गायकवाड आमदार, कल्याण पूर्व.
कायद्याच्या कचाट्यात विशाल गवळी सापडला होता. त्याला न्यायालयाच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा होणे खूप गरजेचे होते. ही शिक्षा इतर असे गु्न्हे करणाऱ्यांना एक मोठा संदेश देऊन गेली असती. आरोपीने आत्महत्या केल्याने नैसर्गिक न्याय तत्वाने या प्रकरणातील कुटुंबीयांना न्याय मिळाला. विश्वनाथ भोईर आमदार, कल्याण पश्चिम.
याप्रकरणात अशा न्यायाची अपेक्षा नव्हती. इतरांना जरब, वचक आणि भिती निर्माण होईल अशाच न्यायाची याप्रकरणात अपेक्षा होती. ही कृत्ये केली की फाशी किंवा तत्सम शिक्षा होतात हा संदेश समाजकंटकांमध्ये जाणे महत्वाचे होते. याप्रकरणांमध्ये न्यायालयाकडून झटपट कठोर शिक्षा होत नाहीत, तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा घालणे कठीण आहे. दीपेश म्हात्रे जिल्हाप्रमुख, ठाकरे गट डोंबिवली.
‘भगवान के घर मे देर है लेकिन अंधेरा नही,’ या न्यायाने परमेश्वराने याप्रकरणात निकाल दिला. शासनाने याप्रकरणात लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लावण्याच्या घोषणा केल्या होत्या. तरीही या प्रकरणात बराच कालापव्य झाला. जी गती या खटल्याला मिळणे अपेक्षित होते, ती मिळाली नसल्याचे जाणवते. आरोपीच्या कर्माची फळे त्याला मिळाली. परमेश्वराने झटपट न्याय करून मृत बालिकेसह कुटुंबीयांना न्याय दिला. ॲड. नवीन सिंग प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस नागरी विकास विभाग.
विशाल आत्महत्या करूच शकत नाही, अशी त्याच्या कुटुंबीयांची भावना आहे. बदलापूर शाळा प्रकरणातील आरोपीला ज्या पध्दतीने चकमकीत मारले गेले, तसाच प्रकार आपल्या मुलाबाबत तुरुंगात झाला असण्याचा संशय विशालच्या कुटुंबीयांना आहे. विशालला अटक केल्यानंतर त्याच्या जीवाला धोका असल्याची आणि सुरक्षिततेची आपण मागणी केली होती. या प्रकरणाचा आता सखोल तपास झाला पाहिजे.ॲड. संजय ढाकणे
विशालचे वकील
मुली, महिलांची छेड, त्यांच्याशी गैरप्रकार केले की कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा होते. असा एक संदेश विशालच्या माध्यमातून समाजात जाणे गरजेचे होते. विशालला कठोर शिक्षा होणारच होती. याची त्याला जाणीव झाली. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. त्याला फाशीची शिक्षा होऊन त्याचा जाहीर कार्यक्रम होणे गरजेचे होते. इतर गुन्हेगारांना तो मोठा धडा होता. मनीषा राणे भाजप महिला पदाधिकारी, डोंबिवली.