कल्याण – मागील वर्षी डिसेंबरमध्ये कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लैंगिक अत्याचार करून बालिकेची हत्या करणाऱ्या विशालला फाशी द्या, या मागणीसाठी अत्याचाराच्या घटनेनंतर दोन महिने नागरिक रस्त्यावर उतरले होते.
शासनाने कल्याणमधील बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची विशाल गवळीने हत्या केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्जवल निकम यांची हा महत्वपूर्ण खटला चालविण्यासाठी विशेष वकील म्हणून नियुक्ती केली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल आणि त्याच्या पत्नी साक्षीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला होता. दोन महिन्यापूर्वी या घटनेचे आरोपपत्र पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगती न्यायालयात दाखल करण्यात आले होते. हा खटला न्यायालयात सुरू होता. याप्रकरणाच्या जलदगती न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्या होत्या.
सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी विशाल गवळीला तळोजा येथील तुरूंगात ठेवले होते. त्याच्या कोठडीलगतच्या स्वच्छता गृहात विशाल गवळीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला आहे. तळोजा तुरुंग प्रशासनाने ही माहिती खारघर पोलिसांना दिली आहे. विशाल गवळीच्या कल्याणमधील कुटुंबीयांना ही माहिती पोलीस, तुरुंग प्रशासनाने दिली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातील एक तेरा वर्षाची बालिका घरातून निघून दुकानात चालली होती. त्यावेळी पाळत ठेऊन असलेल्या विशाल गवळीने त्या बालिकेला आमिष दाखवून स्वताच्या घरात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर विशालने त्या बालिकेची राहत्या घरात क्रूरपणे हत्या केली होती. संध्याकाळी कामावरून परतलेली पत्नी साक्षी गवळी हिच्या मदतीने विशाल आणि साक्षीने बालिकेचा मृतदेह कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव हद्दीत फेकून दिला होता.
या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य हादरले होते. हे क्रूर कृत्य केल्यानंतर विशाल रात्रीतून पत्नी साक्षीचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पळून गेला होता. गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याचा माग काढून शेगाव येथे वेशांतर करून पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या विशालला एक केशकर्तनातून अटक केली होती. पोलिसांनी सलग तीन महिने या प्रकरणाचा सखोल चौकशी करून त्याने गुन्ह्याच्या वापरलेले हत्याचार, गांधारे नदीत फेकून दिलेली पिशवी इतर वस्तू जप्त केल्या होत्या. विशालसह पत्नीला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आरोपपत्र जलदगती न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
विशालवर एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विनयभंग, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, चोरी, खुनाचा प्रयत्न, तडिपाराच्या आदेशाचा भंग करणे समावेश आहे. गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर विशाल पुन्हा गुुन्हे करत होता. बालिकेच्या हत्येपूर्वी तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने हे कृत्य केले होते.
बालिकेच्या हत्येनंतर कल्याण, डोंबिवली शहर परिसरात विशाल गवळीला फाशी द्या या मागणीसाठी महिला संघटना, सामाजिक संस्था यांनी मोर्चे काढून घडल्या घटनेचा निषेध सुरू केला होता. विशाल गवळीला फाशी होत नाही तोपर्यंत हे निषेध मोर्चे सुरूच राहतील, असे इशारा सामाजिक संस्थांनी शासनाला दिले होते. विशालने गळफास घेतल्याचे वृत्त रविवारी सकाळी शहरात पसरताच विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.
विशालचे तीन भाऊ शाम, नवनाथ आणि आकाश गवळी हे सराईत गुन्हेगार होते. त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी चार महिन्यापूर्वी पोलिसांनी ठाणे, रायगड, मुंबई जिल्ह्यातून तडीपार केले आहे.