Vishwanath Bhoir won kalyan west : कल्याण : विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना कल्याण पश्चिमेत शिंदेसेनेचे आमदार महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना महायुतीमधील बंडखोरांकडून आव्हान उभे राहिले होते. त्यामुळे खडतर आव्हान उभे राहिलेल्या भोईर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तगड्या साथीमुळे भोईर यांचा कल्याण पश्चिमेतील मार्ग सुकर झाला. यापूर्वीच्या सत्रात कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एक समझोत्याचा उमेदवार म्हणून उमेदवारी पदरात पडलेले विश्वनाथ भोईर पुन्हा कल्याण पश्चिमेतील शिवसेनेची जागा कायम ठेऊन या भागाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाले आहेत.
मागील पाच ते दहा वर्षापासून कल्याण पश्चिमेतून एकसंध शिवसेना होती तेव्हापासून विजय साळवी, दिवंगत राजेंद्र देवळेकर, शहरप्रमुख रवी पाटील, सचिन बासरे, दिवंगत प्रकाश पेणकर, जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असायचे. या सगळ्या इच्छुकांना मातोश्रीवर एकत्रित करून मग त्यांच्या समोरच समझोत्याचा उमेदवार म्हणून एका उमेदवाराचे नाव पुढे यायचे. अशाच समझोत्यामधून पाच वर्षापूर्वी शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांचे नाव कोणाही शिवसैनिकाच्या मनात नसताना उमेदवार म्हणून पुढे आले. सर्वांनी एक ताकदीने प्रचार करून भोईर यांना पाच वर्षापूर्वी निवडून आणले.
हेही वाचा…डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा गड राखला
निवडणूक आल्यानंतर आमदार भोईर यांनी अनेक विकास कामे शहरात केली. पण त्यांच्याविषयी शिवसैनिक, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी भोईर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर होताच उफाळून आली. भोईर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असेल तर आम्ही किती काळ ताटकळत राहायचे, असे प्रश्न शिवसेना, भाजपमधील इच्छुकांकडून करण्यात आले. शिंदे पिता-पुत्रांनी डोळे वटारून सर्वांना शांत केले. नरेंद्र पवार, वरूण पाटील यांची नंतर समजुत काढून त्यांना उमेदवार भोईर यांच्या व्यासपीठावर आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री कपील पाटील यशस्वी झाले.
हेही वाचा…ठाणे जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा; १८ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय
भिवंडी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार भाजपचे कपील पाटील यांच्या निवडणुकीच्यावेळी कल्याण पश्चिमेत सेनेने काम न केल्याचा राग भाजप कार्यकर्त्यांना होता. कल्याण पश्चिमेतील अभ्यासू, उच्चशिक्षित उमेदवार म्हणून ठाकरे गटातील सचिन बासरे यांनी एक स्वच्छ चेहरा म्हणून भोईर यांच्या समोर आव्हान उभे केले होते. धनशक्तीने अशक्त असले तरी आपल्या अभ्यासू शक्तीच्या बळावर सचिन बासरे मजल मारतील असे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वास होता. मुस्लिम बहुल भागातील मते, भाजपसह परिवारात बासरे यांचा मित्र परिवार असल्याने या सर्व शक्तिच्या बळावर बासरे यांनी सयंतपणे प्रचारात आघाडी घेतली होती. मतचाचण्यांमध्ये बासरे अटीतटीने पुढे जाण्याचे अंदाज वर्तविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचा उमेदवार म्हणून भोईर यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे यात गडबड झाली तर पालिका निवडणुकीत त्याची किंमत मोजायला लागेल या विचाराने महायुतीमधील सर्व कार्यकर्ते, नाराज झटून कामाला लागले आणि भोईर यांनी १ लाख २६ हजार २० मते मिळवून ४२ हजाराचे मताधिक्य मिळविले. तर बासरे यांनी निर्मळ मार्गाने तब्बल ८३ हजार ४६६ मते घेऊन शिवसेनाप्रमुखांचा निष्ठावान अद्याप जागृत असल्याचे दाखवून दिले.