विठ्ठल म्हटलं की आपल्यासमोर उभी राहते ती पंढरपूरस्थित कंबरेवर हात ठेवून उभी असणारी एक मूर्ती. विठ्ठलाचे हे रूप पाहिल्यानंतर आपण भारावून जातो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अनेक कवी, संत गायकांनी आपल्या कलेतून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी सहयोग मंदिर येथे स्वरांच्या माध्यमातून हाच विठ्ठल महिमा अनुभवण्याची अनोखी संधी ठाणेकर रसिकांना उपलब्ध झाली.
‘स्वरबंदिश’ या संस्थेतर्फे ‘विठ्ठल गीती गावा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत ही कला परमेश्वराची कला आहे, असे नेहमीच म्हटले जाते. या मैफिलीत याचा प्रत्यक्ष अनुभव रसिकांना घेता आला. सूर-ताल, भक्ती आणि महिमा यांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठाणेकर रसिक तर अशा सूर-तालात नेहमीच रममाण होतात. परमेश्वराची सुरांच्या माध्यमातून आळवणी करताना जणू काही पाऊसही परमेश्वराची आळवणी करत असल्याचा भास या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत होता. कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय राम कृष्ण हरी’ या गाण्याने झाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण भक्तिमय झाले होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मानसी फडके आणि अवधूत रेगे यांनी त्यांच्या गुरूला आणि विठ्ठलाला जणू काही त्यांच्या आवाजातून, सरावातून हा कार्यक्रम भेट दिला आहे असेच वाटत होते. आपल्या कामात देव शोधा सांगणाऱ्या अनेक संतांचे म्हणणे या वेळी गायक आणि वादकांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
आषाढी एकादशी नुकतीच पार पडली. या वेळी पंढरपुरात पांडुरंगाच्या नामघोषात अवघा वारकरी वर्ग तल्लीन झालेला दिसत होता. मात्र शनिवारी सायंकाळी ‘विठ्ठल गीती गावा’ या कार्यक्रमात ठाणेकर विठ्ठल भक्त दंगून गेले. ‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची’, हा अनुभव ठाणेकरांनी या कार्यक्रमात घेतला. लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेले ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हे गाणे मानसी फडके हिने सादर केले आणि सभागृहात टाळ्यांचा गजर ऐकू आला. त्यानंतर अवधूत रेगे यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हे गीत सादर केले. या वेळी पद्मनाभा नारायण हा अभंग अनेक ज्येष्ठ कलाकरांनी सादर केला आहे. मात्र हा अभंग मानसी आणि अवधूत यांनी एकत्र सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. ‘अवघे गर्जे पंढरपूर, पतीत तु पावना, कानडा विठ्ठलु, संत फार पंढरीत’, आदी अनेक अभंग त्यांनी सादर केली. या वेळी प्रल्हाद मेस्त्री यांनी संवादिनीची साथ दिली तर प्रणव धाळगरकर यांनी ताल वाद्ये, मंदार जाधव साइड ऱ्हीदम, पखवाज सुशांत बर्वे आणि प्रसाद पंडित यांनी तबल्याची साथ दिली. विठ्ठलाचे अभंग गाताना संत नामदेव, ज्ञानेश्वर यांची आठवण झाली नाही तरच नवलच. निवेदक मकरंद वैद्य यांनी प्रत्येक संताचा महिमा त्यांचा निवेदनातून वर्णिला. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. या वेळी संत जनाबाईंची आठवण सांगताना त्यांनी एक ज्ञानी व्यक्ती संत जनाबाईंची भेट घेण्यासाठी आला होता. त्या वेळी त्यांनी जनाई कुठे आहेत असे विचारल्यानंतर जनाई नदीवर कपडे धुण्यास गेल्या आहेत, असे सांगितले. हे ऐकल्यानंतर त्यांचा थोडा निरस झाला. एक संत आणि नदीवर कशी असा प्रश्न त्यांना पडला. नदीवर गेल्यानंतर जनाईची गोवऱ्यांवरून भांडण चालले असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर जनाईला प्रश्न विचारला की, भांडत आहात. त्या वेळी त्यांनी सांगितले, मी केलेल्या गोवऱ्या कुठल्या ते ओळखा. ज्ञानी मनुष्य संभ्रमात पडला. गोवऱ्या आकाराने पण सारख्याच आहेत, त्यामुळे मी कशा ओळखणार असे तो म्हणाला. त्या वेळी अरे ज्यातून विठ्ठल हा आवाज येतो ती गोवरी माझी असे सांगितले आणि खरोखर ज्ञानी माणसाला त्या साऱ्याच गोवऱ्यांमधून विठ्ठल असे ऐकू आले. कामातच विठ्ठल असल्याचे जनाईने त्यांना पटवून दिले होते. ही सुंदर कथा त्यांनी रंगवली.

Story img Loader