लोकसत्ता प्रतिनिधी
उल्हासनगरः कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी आता थेट उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या याच प्रवासासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते. हा फेरा लवकरच थांबणार असून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पाच मिनिटे लागणार आहेत. लवकरच या कामाची निविदा जाहीर केली जाणार आहे.
सध्याच्या घडीला कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातले प्रवासी, वाहन चालक भिवंडी, ठाणे आणि मुंबईत जाण्यासाठी कल्याण शहरातून प्रवास करतात. त्यामुळे कल्याण शहराचे प्रवेशद्वार कोंडीत अडकते. यावर उपाय म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनापुढे जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून विठ्ठलवाडी ते थेट कल्याणच्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी उन्नत मार्गाची संकल्पना मांडली होती. एमएमआरडीएने तात्काळ त्याला मंजुरी देत त्याचे सर्वेक्षण करून भूसंपादन सुरू केले होते. त्यासाठी आवश्यक ७० टक्के जागाही संपादित करण्यात आली आहे.
आणखी वाचा-ठाणे : महामार्ग जोडणीसाठी एमएमआरडीएच्या हालचाली
आराखड्यानुसार विठ्ठलवाडी स्मशानभूमीच्या शेजारून हा उन्नत मार्ग सुरू होतो. कल्याण कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि पुढे कल्याण कसारा रेल्वे मार्ग ओलांडून वालधुनी नदीला समांतर असा हा उन्नत मार्ग थेट कल्याणच्या अहमदनगर महामार्गाला जोडला जाणार आहे. विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीजवळून हा मार्ग सुरू होऊन कल्याण अहमदनगर महामार्गावर पाल्म वॉटर रेसॉर्ट येथे उतरणार आहे. जवळपास अडीच किलोमीटरचा हा मार्ग कल्याण शहरात होणारी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी ७०० कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात जाणारी वाहतूक परस्पर वळवली जाणार आहे.
उन्नत मार्ग महत्वाचा कसा
सध्याच्या घडीला वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातून प्रवास करत शहाड भागात जाणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी थेट मार्ग नाही. जुना कल्याण पुणे लिंक रस्ता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र ही कसरत बंद होऊ शकते.