दिवाळी निमित्त डोंबिवली शहराच्या विविध भागातील मुलांनी सोसायटी, चाळींच्या आवारात किल्ल्यांची बांधणी केली होती. किल्ले बांधणीमध्ये शाळकरी मुलांसह ज्येष्ठ, महिला, पुरुष सहभागी झाले होते. अभ्यासातील विरंगुळा आणि काही वेळ मोबाईल व्यस्तते मधून बाहेर राहून मुलांनी माती, दगड, विटा, चिखल-पाण्याशी एकरुप होऊन किल्ल्यांची बांधणी केली म्हणून त्यांना प्रोत्साहित आणि कौतुक करण्यासाठी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>डोंबिवलीत बेकायदा इमारतीवरील गच्चीवरील बांधकामाला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद?

या स्पर्धेत डोंबिवलीतील २२ किल्ले बांधणीतील मुले सहभागी झाली होती. शहरी सिमेंटच्या जंगलात माती, चिखल या गोष्टींपासून मुले दुरावत चालली आहेत. हा विचार करुन मुलांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी या विचाराने सोसायटी पदाधिकाऱ्यांनी मुलांना किल्ले बांधणीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष साहाय्य केले होते.

विशाळगड प्रथम
डोंबिवली पूर्व सारस्वत काॅलनी मधील विवेकानंद सोसायटीच्या आवारात मुलांनी ६५ फूट लांबीचा विशाळगड ते पन्हाळ गड किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे. या प्रतिकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. आयरे मढवी शाळे शेजारील बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला व्दितीय क्रमांक, देवीचापाडा राजाराम सोसायटीतील मुलांनी मिर्जन दुर्ग (कर्नाटक) किल्ला प्रतिकृती, डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील दत्तनगर बाॅईज संघाने परांडा किल्ला साकारला आहे. या दोन्ही सहभागी बालगोपाळांच्या प्रतिकृतींना तिसरा क्रमांक देण्यात आला.
उत्तेजनार्थ गटात प्रथम क्रमांक देवीचापाडा बालाजी वाडी येथील सिंहगड, व्दितीय पारितोषिक शिवबा मावळा संघ, जिजाईनगर मधील नवनाथ धाम सोसायटीतील खांदेरी किल्ला प्रतिकृतीला देण्यात आला.

हेही वाचा >>>डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखा शिंदेंच्या ताब्यात ; शिंदे समर्थकांनी खरेदी केली शिवसेना शाखेची जागा

किल्ल्याच्या ठिकाणी मुलांनी ऐतिहासिक गीते, देशभक्तीपर गीते लावली होती. गायली जात होती. या किल्ल्यांवर सूर्यास्तानंतर पेटते पलिते लावले जातात. प्रवेशद्वारावर रखवालदार तैनात केला जातो. रात्रीचे हाकारे देण्यासाठी मावळे किल्ल्यांवर उभे केले जातात. किल्ले पाहणीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.या किल्ल्यांचे परीक्षक म्हणून ट्रेक क्षितिज संस्थेचे महेंद्र गोवेकर, महाराष्ट्र माऊंटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन केंद्राचे समन्वयक राहुल मेश्राम, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. किल्ले बांधणी स्पर्धेतील गुणवंतांचा सन्मान सोहळा जानेवारी मध्ये करण्यात येणार आहे, असे केतकर यांनी सांगितले.

टिळकनगर शाळेत किल्ले

टिळकनगर शाळेच्या आवारात २१ किल्ल्यांच्या प्रतिकृती ३५० मुलांनी उभारल्या आहेत. हे किल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी अधिक संख्येने येण्याचे आवाहन मंडळाचे कार्यवाह बल्लाळ केतकर यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivekananda society vishalgarh to panhala fort first in dombivli fort construction competition amy
Show comments