ठाणे : महाविकास आघाडीतील घटक पक्षात असलेली नाराजी, जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज आणि नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाकडून उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी सोपी ठरेल हा सुरुवातीचा अंदाज निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मात्र पूर्णपणे चुकीचा ठरल्याचे चित्र या मतदारसंघात होते. शहापूर, मुरबाड भागातील कुणबी मतदारांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली. शिवाय मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या समर्थकांमध्ये असलेली नाराजी पाटील यांना किती अडचणीची ठरते यावर येथील निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.
हेही वाचा >>> ठाणे : फलाट क्रमांक पाच रविवारपासून प्रवाशांसाठी उपलब्ध
भिवंडी लोकसभा मतदारसंघात यंदा एकूण ५९.८० टक्के इतक्या प्रमाणात मतदान झाले. यामध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७२.६६ टक्के, शहापूरात ७०.२६ टक्के, मुरबाडमध्ये ६१.१२ टक्के इतके मतदान झाले. या मतदारसंघातील मुस्लीमबहुल विधानसभा क्षेत्र असलेल्या भिवंडी पूर्व भागात ४९.८७ टक्के तर भिवंडी पश्चिमेत ५५.१७ टक्के इतके मतदान झाले. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या कल्याण पश्चिमेत ५२ टक्के इतके मतदान झाले असून कपिल पाटील यांची या मतांवर अधिक भिस्त आहे. शहापूर, मुरबाड तसेच भिवंडी ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर कुणबी तसेच आगरी मते असून ही मते कुणाच्या पारड्यात जातात याविषयी उत्सुकता आहे.
पाच वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत कपील पाटील यांना मुरबाड तसेच भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले होते. यावेळी निलेश सांबरे यांची उमेदवारी पाटील यांच्या पथ्यावर पडेल असे चित्र सुरुवातीला होते. मात्र शहापूर आणि मुरबाड भागातील कुणबी समाजात सांबरे यांच्याविषयी सहानभूती दिसली. यामुळे ही लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांच्यासाठी पोषक ठरते की काय असे चित्र निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात निर्माण झाले. विशेष म्हणजे, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. मात्र पाटील यांच्या वागणुकीमुळे पाच वर्ष दुखावलेला कथोरेसमर्थक अखेरपर्यत निवडणुकांच्या रणधुमाळीत फारसा दिसलाच नाही.
© The Indian Express (P) Ltd