अंतिम मतदारयाद्या १५ दिवसांनंतर प्रसिद्ध; प्रचारासाठी कमी अवधी मिळण्याची शक्यता
मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये असलेल्या प्रचंड गोंधळाचा फटका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बसणार आहे. मतदारयाद्यांतील गोंधळामुळे अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यचा कार्यक्रम १५ दिवस पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करण्यासाठी फारच कमी अवधी मिळणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची तारीख दोन दिवसांत घोषित होणे अपेक्षित आहे; परंतु अंतिम मतदारयाद्या २० जुलैला प्रसिद्ध होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया त्यानंतरच सुरू होणार आहे. निवडणुकीसाठी मतदान १५ ते २० ऑगस्टदरम्यान होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांना अवघे वीस-एकवीस दिवसच प्रचाराला मिळणार आहेत.
निवडणुकीसाठी चार सदस्यांचे प्रभाग असल्याने या वेळी प्रभागदेखील मोठे झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रभाग पालथा घालण्यासाठी या वेळी उमेदवारांची दमछाक होणार आहे.
निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ६ जुलैला अंतिम याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गोंधळ झाला असल्याचे स्पष्ट झाले. गोंधळ निस्तरण्यासाठी आणि हरकतींची पडताळणी करण्यासाठी अवधी लागणार असल्याने अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत २० जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
उमेदवारांची तारेवरची कसरत
सध्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपल्या उमदेवारांची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. बंडखोरीच्या भीतीने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी अंतिम टप्प्यात अनेक उमेदवारांना पक्षाकडून हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी उमेदवारांना अवघे वीस-एकवीस दिवसच मिळणार आहेत. आधीच चार सदस्य प्रभाग रचनेमुळे प्रभागाच्या आकारमानात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. या परिस्थितीत हाती असलेल्या अवधीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.