अंबरनाथमध्ये महिनाभरात २४ अर्ज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी वर्षांत होणाऱ्या कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सध्या राजकीय पक्षांमध्ये अहमहमिका लागली असली तरी या निवडणुकीसाठी नोंदणी करण्यास जिल्ह्यातील पदवीधर फारसे इच्छुक नसल्याचे चित्र पुढे येत आहे. जुनी यादी मोडीत काढत या निवडणुकांसाठी नव्याने नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, महिना उलटला तरी अंबरनाथ तहसील कार्यालयात पदवीधरांच्या नोंदणीचे अवघे २४ अर्ज आतापर्यंत जमा झाले आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळचा भाजप आणि संघ परिवाराचा बालेकिल्ला समजला जातो. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी तत्कालीन आमदार संजय केळकर यांचा मोठा पराभव केला. पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया फारसा मजबूत नसतानाही कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील पक्षातील नेत्यांच्या बळावर डावखरे यांनी विजयाची पताका फडकावली. नवी मुंबईतून गणेश नाईक, रायगडातून सुनील तटकरे, मुरबाड पट्टय़ातून किसन कथोरे तसेच भास्कर जाधव, नारायण राणे यासारख्या नेत्यांनी जोर लावल्याने एकत्रित प्रयत्नातून निरंजन यांचा विजय सुकर झाला आणि भाजपला बालेकिल्ल्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. या मतदारसंघात पुढील वर्षी जुलै महिन्यात पुन्हा निवडणूक होत असून यंदा भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेनेही िरगणात उतरण्याची तयारी केली आहे. विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बैठकांचा झपाटा लावला असला तरी शेवटच्या क्षणी ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. याशिवाय भाजपमधूनही यंदा उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. एकीकडे हे चित्र असले तरी मतदारांच्या नोंदणी प्रक्रियेत मात्र निरुत्साह दिसत असल्याने पक्ष पदाधिकारीही भांबावून गेले आहेत.

नवी यादी २८ सप्टेंबरपासून नव्याने पदवीधर मतदार नोंदणी हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज वितरित व स्वीकारले जातात. मात्र २८ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या नोंदणीत आजपर्यंत अंबरनाथ परिसरात अवघे २४ अर्जच नोंदणीसाठी आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील इतर भागांतही अजूनही फारशी नोंदणी झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter registration graduate constituency elections
Show comments