लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिसणाऱ्या मतदारांच्या रांगा विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिसून आल्या नाहीत. सकाळच्या वेळेत तुरळक मतदार मतदान केंद्रावर आले होते. सलग सुट्टय़ा आल्यामुळे अनेक मतदार पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्याचाही परिणाम मतदानावर झाला. सकाळी निरुत्साह असला तरी दुपारनंतर मात्र उत्साह वाढल्याचे चित्र होते.

ठाणे शहर

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी-पाचपखाडी, ओवळा-माजिवडा, ठाणे शहर आणि कळवा-मुंब्रा या चारही मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद होता. नऊ वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदार येण्यास सुरुवात झाली असली तरी फारसा उत्साह नव्हता. विशेष म्हणजे, सकाळच्या वेळेत तरुणांपेक्षा वृद्ध नागरिकांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.

ठाणे, कोपरी, कळवा आणि मुंब्रा परिसरातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना काही काळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.

वागळे इस्टेटमधील अंबिकानगर भागात सकाळच्या वेळेत पंधरा मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाल्याने या ठिकाणी टॉर्चच्या मदतीने मतदान केले जात होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेस विलंब होत असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगा वाढल्या होत्या.

कल्याण/डोंबिवली

सकाळच्या वेळेत मतदान केंद्रावर फारशा रांगा नव्हत्या. दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा वाढू लागल्या. सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी उशिरा मतदान केंद्रावर येणे पसंत केले. सकाळच्या वेळेत मुलांचे खासगी शिकवणी वर्ग असतात. त्यांची ने-आण करण्यासाठी पालकांची धावपळ असते. त्यामुळे काही पालकांनी आपण दुपारनंतर मतदानासाठी आल्याचे सांगितले.

२७ गावांतील खोणी, दिवा, आगासन, नेतिवली भागात मतदार सकाळपासून अधिक संख्येने बाहेर पडले होते. असे असले तरी कल्याण, डोंबिवली शहरी भागातील मतदान केंद्रांवर दुपारी १२ वाजेपर्यंत निरुत्साही वातावरण होते.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव असणाऱ्या काही मतदारांची नावे या निवडणुकीत मात्र नव्हती. काही मतदारांची नावे अन्य विभागांतील याद्यांमध्ये टाकण्यात आली होती. असे असले तरी मतदारांना दोन दिवस आधीच त्यांच्या मोबाइलवर मतदाराचे नाव, त्याचा अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे ठिकाण याची सविस्तर माहिती उमेदवारांनी घरपोच पाठविली होती. त्यामुळे अनेक मतदार थेट मतदान केंद्रांवर येऊन मतदान करीत होते. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली मतदारसंघांत सकाळच्या वेळेत असलेले निरुत्साहाचे वातावरण दुपारनंतर बदलले. दुपारनंतर मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी बाहेर पडले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. गावातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी केंद्रावर आले होते.

कोपरी-पाचपखाडी

मतदारसंघातील कोपरी, शिवाजीनगर, पडवळनगर, हाजुरी, किसननगर, शांतीनगर, इंदिरानगर, सावरकरनगर आणि अन्य परिसरांतील मतदान केंद्रांवर मतदारांची फारशी गर्दी नव्हती. सकाळी ७ ते ९ या दोन तासांत ६ टक्के इतके मतदान झाले.  ९ वाजेनंतर पावसाने विश्रांती घेतली आणि मतदान केंद्रावर मतदार येण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ ते ४ या वेळेत अवघे २० टक्के मतदान वाढले आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचली.

ठाणे शहर

मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत ६ टक्के मतदान झाले. पुढील दोन तासांत १७ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील चरई, नौपाडा, पाचपखाडी या भागांतील मतदान केंद्रांवर सकाळच्या वेळेत वृद्ध मतदार मोठय़ा संख्येने दिसून आले.

ओवळा-माजिवडा मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत ५ टक्के मतदान झाले होते. पुढील दोन तासांत मतदानाची टक्केवारी १४ टक्क्यांपर्यंत पोहोचली. या मतदारसंघातील केंद्राबाहेर मतदारांची फारशी गर्दी नव्हती. पाच ते सहा मतदार मतदान केंद्राबाहेर उभे असल्याचे चित्र होते.दुपापर्यंत ३० टक्के इतके मतदान झाले होते.

कळवा-मुंब्रा

मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत ४ टक्के इतकेच मतदान झाले होते. पुढील दोन तासांत मतदानाची टक्केवारी ११ टक्क्यांपर्यंत पोहोचली. दुपारी १२ वाजेनंतर मात्र मुंब्य्रातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढू लागली. दुपारी चार वाजेपर्यंत या ठिकाणी ३१ टक्के इतके मतदान झाले होते.

शहापूर

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळत होता. तरुण, नवमतदार हे सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर रांगेत होते. तर ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाला भरघोस प्रतिसाद दिला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहापूर मतदारसंघात ५७.२५ टक्के मतदान झाले होते. शिवसेनेचे पांडुरंग बरोरा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा असा हा सामना शहापूरमध्ये होतो आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. आदिवासीबहुल मतदारसंघ असतानाही मतदान चांगल्या प्रमाणात झाल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे.

भिवंडी

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला तर त्या तुलनेत मात्र शहरी भागातील पूर्व आणि पश्चिम मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये निरुत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे भिवंडी ग्रामीणमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत ४४ तर पूर्व आणि पश्चिममध्ये जेमतेम ३५ टक्के इतके मतदान झाले होते.

भिवंडी ग्रामीण, पूर्व आणि पश्चिम या तीन मतदारसंघांमध्ये सकाळच्या वेळेत मतदान केंद्राबाहेर मतदारांची फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी जेमतेम ६ टक्के इतके मतदान झाले होते. सकाळी ११ वाजल्यानंतर ग्रामीण भागातील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले.  ग्रामीणमध्ये सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ५.४६ टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत या ठिकाणी सरासरी ४४ टक्के इतके मतदान झाले होते. १८ विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान भिवंडी ग्रामीणमध्ये झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले.  दुपारी चार वाजेपर्यंत भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये अनुक्रमे सरासरी ३५.०१ टक्के आणि ३५.०८ टक्के मतदान झाले होते. मुस्लीम मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले.

उल्हासनगर अंबरनाथ

प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाही उल्हासनगर आणि अंबरनाथ या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला. दुपारी तीन वाजेपर्यंत उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात राज्यातील सर्वात कमी मतदानाच्या टक्केवारीची नोंद झाली. उल्हासनगरमध्ये अवघे २५.८२ टक्के इतके मतदान झाले. तर अंबरनाथ मतदारसंघामध्ये अवघे २८.१६ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे मतदारांनी मतदानाकडे यंदाही पाठ फिरवल्याचे चित्र होते.

भाजपचे कुमार आयलानी विरुद्ध ज्योती कलानी असा थेट सामना या मतदारसंघामध्ये आहे. मात्र, मतदारांनी यंदाही मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत तुरळक मतदान पार पडले. ११ वाजेनंतर येथील मतदार बाहेर पडून मतदान करू लागले. मात्र त्यानंतरही दुपारी तीन वाजेपर्यंत अवघे २५. ८२ टक्के इतके मतदान उल्हासनगरात झाले होते.  दुपारी तीन वाजता राज्यातील सर्वात कमी मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये उल्हासनगर पहिल्या क्रमांकावर होते.

त्यापाठोपाठ अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातही मतदारांचा निरुत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत अवघे २८.१६ टक्के मतदान झाले होते. दोन्ही मतदारसंघांमध्ये फारशा रांगा नव्हत्या. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदारांचा निरुत्साह दिसून आला.

 बदलापूर

मुरबाड विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. सकाळी सात वाजता पावसाची रिमझिम सुरू असल्याने मतदार घराबाहेर पडले नाहीत. मात्र अकरानंतर ग्रामीण भागातील मतदारांनी मतदार केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. मुरबाड विधानसभा मतदारसंघात दुपारी चार वाजेपर्यंत ४३ टक्के मतदान झाले होते. त्याच वेळी बदलापूर शहरात मात्र मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला.

भाजपचे किसन कथोरे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद हिंदुराव यांचे आव्हान होते. साडेदहाच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दोन दिवसांनी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर मतदानाची आकडेवारी वाढू लागली.  मात्र, मुरबाड मतदारसंघाचा भाग असलेल्या बदलापूर शहरात मतदान केंद्राबाहेर रांगा क्वचितच पाहायला मिळाल्या. त्याच वेळी ग्रामीण भागात मात्र दुपारनंतर मतदान केंद्राबाहेर रांगा पाहायला मिळाल्या.

दोन मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र काही मिनिटे काम बंद होते. मात्र तातडीने दुरुस्ती करत मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

दुपारी तीन वाजेपर्यंत मुरबाड विधानसभा मतदारसंघात ४३ टक्के मतदान झाले होते. तसेच मतदान केंद्राकडे जाण्याचा मतदारांचा ओघ सुरूच होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, मुरबाड विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढाई असली तरी बदलापुरातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या मतदानासाठी मतदार बाहेर पडले नाहीत असे विविध पक्षांचे पदाधिकारी खासगीत सांगत होते. लांबच लांब रांगा मतदान केंद्राबाहेर क्वचितच पाहायला मिळत होत्या.

मुरबाड-बदलापूर

मुरबाड विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. सकाळी सात वाजता पावसाची रिमझिम सुरू असल्याने मतदार घराबाहेर पडले नाहीत. मात्र अकरानंतर ग्रामीण भागातील मतदारांनी मतदार केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. मुरबाड विधानसभा मतदारसंघात दुपारी चार वाजेपर्यंत ४३ टक्के मतदान झाले होते. त्याच वेळी बदलापूर शहरात मात्र मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला.

भाजपचे किसन कथोरे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद हिंदुराव यांचे आव्हान होते. साडेदहाच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दोन दिवसांनी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर मतदानाची आकडेवारी वाढू लागली.  मात्र, मुरबाड मतदारसंघाचा भाग असलेल्या बदलापूर शहरात मतदान केंद्राबाहेर रांगा क्वचितच पाहायला मिळाल्या. त्याच वेळी ग्रामीण भागात मात्र दुपारनंतर मतदान केंद्राबाहेर रांगा पाहायला मिळाल्या.

दोन मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र काही मिनिटे काम बंद होते. मात्र तातडीने दुरुस्ती करत मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

दुपारी तीन वाजेपर्यंत मुरबाड विधानसभा मतदारसंघात ४३ टक्के मतदान झाले होते. तसेच मतदान केंद्राकडे जाण्याचा मतदारांचा ओघ सुरूच होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, मुरबाड विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढाई असली तरी बदलापुरातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या मतदानासाठी मतदार बाहेर पडले नाहीत असे विविध पक्षांचे पदाधिकारी खासगीत सांगत होते. लांबच लांब रांगा मतदान केंद्राबाहेर क्वचितच पाहायला मिळत होत्या.

ठाणेकर कलाकाराचे मतदान

सर्वसामान्य मतदारांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अनेक सिनेकलाकांरानी मतदान केल्याची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित केली होती. दिग्दर्शक रवी जाधव, विजू माने, गिरीश मोहिते, जयंत पवार, लेखक शिरीष लाटकर, अभिनेते उदय सबनीस, अभिनेता मंगेश देसाई, अभिनेत्री मधुरा गोडबोले या कलाकारांनी ठाणे शहरातील विविध भागांतील मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केले.