|| नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांकडून चौकशीची मागणी

पालघर लोकसभा मतदारसंघात गेल्या वर्षभरात मतदार संख्येत झपाटय़ाने वाढ झाली असून, प्रत्येक दिवशी ६०० ते एक हजार इतके नवीन मतदार नोंदवले गेले आहेत. एकीकडे नमुना क्रमांक- ६ हा अर्ज भरून मतदार यादीत नाव येण्यासाठी अनेक नागरिक प्रतीक्षेत असताना दुसरीकडे जलद गतीने मतदार नोंदणी झाल्याची दिसून आल्याने या प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

पालघरमध्ये अनेक स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी निवडणूक मतदार नोंदणी कार्यक्रमादरम्यान नमुना सहा, नावात व पत्त्यात दुरुस्तीसाठी क्रमांक आठ आणि इतर अर्ज भरून दिल्यानंतरही नाव मतदार यादीत समाविष्ट झाले नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र जलद गतीने मतदारांची नोंदणी होत असल्याने या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनामुळे मे २०१८ मध्ये पालघर लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली. त्या वेळी पालघरमध्ये १७ लाख ३१ हजार मतदारांची नोंद झाली होती. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०१९ निश्चित झालेल्या पालघर लोकसभेच्या मतदार संख्या सुमारे १८ लाख १३ हजार इतकी होती, तर लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू होता. या निवडणुकीसाठी १८ लाख ८५ हजार मतदान नोंदवले गेले. गेल्या वर्षभरात पालघरमध्ये एक लाख ५४ हजार नवीन मतदारांची नोंद झाली.

१ जानेवारी ते ९ एप्रिल २०१९ या ७५ दिवसांच्या कामकाजाच्या कालावधीत पालघरमध्ये ७२ हजार नवीन मतदारांची नोंद झाल्याची माहिती पुढे आली असून दिवसाला सुमारे ९५० ते एक हजार नवीन मतदार नोंदले गेल्याचे दिसून येत आहे. यात नालासोपारा, बोईसर येथे रोज सरासरी सुमारे ३०० तर वसईचे दररोज दीडशे नवमतदारांची नोंदणी झाली असून या सर्व नवीन नोंद केलेल्या मतदारांची पडताळणी व इतर कागदपत्रांची पूर्तता केली गेली का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे.