समाजसेवा हीच ईश्वरसेवा या संतांच्या शिकवणीनुसार कार्यरत असलेल्या ज्ञानदेव सेवा मंडळ या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ८ ते १७ जानेवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. नामवंतांची कीर्तने, प्रवचने, भजने, महाप्रसाद आदी धार्मिक उपक्रमांबरोबरच सप्ताहादरम्यान शनिवारी १६ जानेवारी रोजी दंतरोग चिकित्सा करणारे आरोग्य शिबीरही आयोजित करण्यात आले आहे. गेली ४२ वर्षे आध्यात्मिक प्रेरणेने विविध सामाजिक उपक्रम राबवविणारे मंडळ असा लौकिक असणाऱ्या या संस्थेविषयी..
ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे
आता ठाण्याचा मध्यवर्ती ठिकाणी भाग असलेल्या पाचपाखाडी विभागात चार दशकांपूर्वी शहरातील वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी ज्ञानदेव सेवा मंडळाची स्थापना केली. त्या वेळी हा भाग मुख्य शहराबाहेर होता. शहरातील सुप्रसिद्ध कीर्तनकार दिवंगत द. स. शिंदे, वामन मराठे, स्वातंत्र्यसैनिक पु.मो. परचुरे, तत्कालीन नगरसेविका शीला मराठे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला.
वारकरी परंपरेतील संतांच्या शिकवणीनुसार मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. पाचपाखाडी येथील जागेत ज्ञानेश्वरांचे मंदिर, निवृत्तिनाथ सभागृह, ज्ञानराज सभागृह, सोपान नेत्र रुग्णालय, धार्मिक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. संस्थेचा कार्य असे बहुपेडी स्वरूपाचे असल्याने निरनिराळ्या उपक्रमांसाठी विविध समित्या कार्यरत आहेत. सभागृह हेच उत्पन्नाचे एकमेव साधन असले तरी सामाजिक उपक्रमांसाठी ते सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते. ठाणे-पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मंडळातर्फे नियमितपणे मदत केली जाते. भविष्यात एखादे गाव दत्तक घेऊन तिथे सातत्याने विविध उपक्रम राबविण्याचा मंडळाचा विचार आहे. सध्या मंडळाच्या प्रांगणात वाचनालय उपलब्ध आहे. संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत धार्मिक पुस्तके विनामूल्य वाचायला उपलब्ध करून दिली जातात. वाढती गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी संस्थेच्या प्रांगणात अभ्यासिका सुरू करण्याची योजना आहे. वामन मराठे. पु. मो. परचुरे, प्र.ग.वैद्य आणि कृ.श्री. देव हे मंडळाचे विद्यमान विश्वस्त आहेत. अध्यक्ष एकनाथ सदगीर, कोषाध्यक्ष शांताराम चौधरी, कार्यवाह विजय घोसाळकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते संस्थेचा कार्यभार सांभाळीत आहेत.
सुप्रसिद्ध तबला/पखवाजवादक हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातर्फे पखवाज प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. दर बुधवारी ज्ञानदेव सेवा महिला मंडळाचे भजन होते. त्याचप्रमाणे दर रविवारी मंडळातर्फे भगवत गीतेची संथा देण्याचा उपक्रम राबविला जातो. संत सोपान नेत्र रुग्णालयात सवलतीच्या दरात नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात.
मंदिर समिती
संस्थेचे धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम या समितीमार्फत राबविले जातात. जानेवारी महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताह या मोठा उत्सव असतो. सप्ताहात सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम असतात. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार या सप्ताहानिमित्त ठाण्यात येतात. एकादशी, सतांची जयंती, पुण्यतिथी यानिमित्तानेही वर्षभर व्याख्याने, प्रवचने आयोजित केली जातात. भागवत सप्ताह, एक महिना काकड भजन, श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरीचे त्रिकाल पारायण, दररोज हरिपाठ, अधिक मास तसेच पितृपक्षानिमित्त विशेष कार्यक्रम होतात. त्याचे संयोजन ही समिती करते.
ज्ञानराज समिती
कार्यकर्त्यांच्या उपलब्धतेनुसार या समितीमार्फत संस्कार वर्ग, लघुउद्योग, शिक्षण बालक मेळावे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय,व्याख्याने, कोजागरी पौर्णिमेला सांस्कृतिक कार्यक्रम, गायनाच्या मैफली आयोजित केल्या जातात. मंडळाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सलग २५ वर्षे एकेक संतांचा समग्र परिचय करून देणारे विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. लवकरच ही संग्राह्य़ माहिती पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याशिवाय मंडळाने श्री ज्ञानेश्वर चिंतन (द. स. शिंदे), भक्तिमार्गदर्शन (ना. रा. पाठक), मनाचे श्लोक-एक मनोपनिषद (डॉ. शिरीष कुलकर्णी), हरिपाठ, काकडा, आरती, भजन आदी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. अलीकडेच मंडळाने नामदेव गाथा प्रकाशित केली आहे. याशिवाय खास पारायणासाठी मंडळाने सवलतीच्या दरात ज्ञानेश्वरीची प्रत उपलब्ध करून दिली आहे.
मुक्ताई भगिनी मंडळ
दर शुक्रवारी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. विविध विषयातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा, खेळ, गाणी, विविध कलागुण दर्शन, स्पर्धा, चैत्रात हळदी-कुंकू आदी कार्यक्रमांचा त्यात समावेश असतो. मंडळातर्फे वेळोवेळी संतदर्शन सहलींचे आयोजन केले जाते. आषाढी-पंढरपूर वारीसाठी खास बसव्यवस्था केली आहे.
आरोग्य समिती
मंडळातर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातात. सध्या मंडळात होमिओपथी दवाखाना कार्यरत आहे. दरवर्षी वार्षिक महोत्सवात एका विशिष्ट आजाराच्या तज्ज्ञाला पाचारण करून रुग्ण तपासणी शिबीर आयोजित केले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या पंढरपूर यात्रेत मंडळातर्फे शिबीर भरविले जाते. त्यात प्रत्येकी सात-साठ डॉक्टर्स आणि कार्यकर्ते सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत हे पथक असते. वारकऱ्यांची शुश्रूषा करणारा हा उपक्रम गेली तीस वर्षे अव्याहतपणे राबविला जातोय. साधारणपणे पाच लाखांहून अधिक किमतीची औषधे या पथकासोबत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा