प्रवाशांशी उर्मट वर्तन आणि अपहार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी वाढल्यानंतर परिवहन सेवेने कठोर कारवाई सुरू केली आहे. प्रवाशांशी उर्मट वर्तन करणे तसेच प्रवाशांच्या तिकिटांचा अपहार केल्याप्रकरणी तब्बल ३७ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या ठेकेदारामार्फत ही सेवा ३८ मार्गावर सुरू आहेत. परिवहन सेवेच्या एकूण १४९ बस असून त्यात ३० बस या पालिकेच्या आहेत. परंतु परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांबाबत अनेक तक्रारी येत होत्या. प्रवाशांशी उर्मट वर्तन करणे, अरेरावी करणे, सुटय़ा पैशांवरून वाद घालणे या तक्रारी होत्या. याशिवाय प्रवाशांना तिकीट न देता त्यांच्या रकमेचा अपहार केला जात होता. हा प्रकार लक्षात येताच परिवहन सेवेने भरारी दक्षता पथक नेमले होते. प्रवाशांच्या तक्रारी आणि भरारी पथकाला दोषी आढळलेल्या तब्बल ३७ बस वाहकांना सेवेतून कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहे.

थांब्यांवर तक्रार पेटी

प्रवाशांना कुठल्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी परिवहन सेवेने पाचही प्रमुख थांब्यावर तक्रारपेटी बसवण्यात आली असून २४ तास सुरू राहणारी हेल्पलाइन सुरू केली आहे. बस आणि बस कर्मचाऱ्यांबद्दल कुठलीही तक्रार असेल तर ०२५०-२३९११२२ आणि ८६९१०६२८२८ या हेल्पलाइनवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि हेल्पलाइन सेवा

प्रवाशांशी कसे वागावे, सेवा कशी द्यावी याबाबत परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी खास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. बेस्टमधील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वाहने कशी चालवावी याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थेतर्फे सौजन्याने कसे वागावे याचे धडे बसवाहक आणि चालकांना दिले जात आहे. आतापर्यंत दहा प्रशिक्षण शिबिरे पूर्ण झाली आहेत. यानंतरही ज्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार येईल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन सेवेत काम करणारे कर्मचारी हे स्थानिक असतात. प्रवाशांशी सौजन्याने वागण्याऐवजी ते प्रवाशांशी उर्मटपणे वागत होते. यामुळे परिवहन सेवेचेही नाव खराब होत होते. हे लक्षात घेऊन आम्ही ३७ बस वाहकांना निलंबित केले आहे. बसचालक आणि वाहकांवर लक्ष ठेवण्यासाठी ३२ जणांचे भरारी पथकही स्थापन करण्यात आले आहे.

मनोहर सतपाळ, संचालक, मसर्स भीगीरथी ट्रानसपोर्ट लिमिटेड.