मुदत संपून तीन महिन्यांनंतरही काम अपूर्णच; वाय जंक्शन जोडणीचे काम शिल्लक
ठाणे : करोनाच्या पहिल्या लाटेत लागू केलेली टाळेबंदी आणि निर्बंधांच्या काळात रखडलेल्या कळवा तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाला गेल्या वर्षी गती देत पालिका प्रशासनाने ऑक्टोबर २०२१ महिन्याच्या अखेरीस पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी मुदत आखून दिली होती; परंतु ही मुदत उलटून तीन महिन्यांचा काळ लोटत आला तरी पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पुलाची एक मार्गिका खुली होण्यासाठी अजून साडेतीन महिने वाट पाहावी लागणार आहे.
ठाणे आणि कळवा तसेच नवी मुंबई या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल आहेत. त्यापैकी ब्रिटिशकालीन खाडीपूल धोकादायक झाल्याने तो काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर दुसऱ्या खाडी पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू आहे. या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत असून ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने तिसरा खाडी पूल उभारण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला; परंतु गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे पुलाचे काम रखडत असल्याने ते ठरलेल्या मुदतीत पूर्ण होऊ शकलेले नाही. सुरुवातीला डिसेंबर २०१९ ची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु करोना टाळेबंदीमुळे पूल उभारणीचे काम रखडले.
टाळेबंदी आणि निर्बंध शिथिल झाल्यानंतर पालिका प्रशासनाने पुलाच्या कामाची गती वाढवून ऑक्टोबर २०२१ महिन्याच्या अखेरीस पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी मुदत आखून दिली होती. या पुलाच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा असलेले काम वर्षभरापूर्वी करण्यात आले होते. त्यामध्ये कळवा पुलाचा १०० मीटर लांब आणि १७.५ मीटर रुंदीचा १०५० टन वजनाचा स्टीलचा सांगाडा १४ मीटपर्यंत उचलून पुलाच्या खांबावर ठेवण्यात आला होता. या कामानंतर पुलाच्या कामाला गती मिळाल्याचे चित्र होते; परंतु ऑक्टोबर २०२१च्या मुदतीनंतर तीन महिन्यांचा काळ लोटला तरी पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
वर्तुळाकार मार्गिकांचे काम शिल्लक
कळवा तिसरा खाडी पुलावरील साकेतच्या दिशेने जाणारी वर्तुळाकार मार्गिका आणि पादचाऱ्यांकरिता मार्गिका उभारणीचे काम शिल्लक आहे, तर ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका आणि क्रीक नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिका उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. या पुलावर क्रीक नाका आणि साकेतकडे जाणाऱ्या मार्गिकांच्या जोडणीसाठी वाय जंक्शनचे काम पूर्ण करावे लागणार असून त्यासाठी साडेतीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. यानंतर पुलाची एक मार्गिका खुली होऊ शकेल, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
पुलाची रचना
कळवा तिसरा खाडी पुलाचे बांधकाम एकूण २.४० किमी असणार आहे. १८१ कोटी १९ लाख रुपये खर्चून हा पूल तयार करण्यात येत आहेत. या खाडी पुलाची लांबी ३०० मीटरची आहे. या पुलावर क्रीक नाका आणि कोर्ट नाक्याहून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी मार्गिका उभारण्यात येत आहे. साकेतकडून येणाऱ्या वाहनांसाठी वर्तुळाकार मार्गिका उभारण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येत आहे. पादचाऱ्यांकरिता स्वतंत्र मार्गिका असणार आहे. त्याचबरोबर विद्युतीकरण आणि सुशोभीकरण अशी कामे करण्यात येणार आहेत.