प्रशासकीय उदासीनतेमुळे लाभार्थ्यांना नशिबी खेटे
पालघर जिल्ह्य़ात पंतप्रधान आवास योजनेपासून गरीब आणि आदिवासी लाभार्थी वंचित राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात मंजूर झालेल्या १४ हजार घरांपैकी पाच हजार घरांचे काम अद्याप अपूर्णच आहे. तर अनेक घरांना आजतागायत निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला नाही. घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या सध्या हजारांत आहे. त्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येत असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
अभियंत्यांची डोकेदुखी
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घराची छायाचित्रे ‘अपलोड’ करण्यापासून ते मापन अशी सर्व कामे ही अभियंत्यांना करावी लागत आहेत. प्रत्येक तालुक्यात अभियंत्याच्या अपुऱ्या संख्येमुळे ही प्रक्रिया करताना अडचणी सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम लाभार्थ्यांना निधी उशिरा मिळण्यात होत आहे.
ग्रामसेवक अनभिज्ञ
निधीची रक्कम मिळत नसल्याने लाभार्थी ग्रामसेवकाकडे याबाबत विचारणा करण्यासाठी जातात. परंतु याबाबत ग्रामसेवक अनभिज्ञ असल्याने ते ग्रामस्थांना थेट पंचायत समितीकडे चौकशीसाठी पाठवतात. पंचायत समितीतही लाभार्थ्यांना अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. छायाचित्र अपलोड न झाल्याचे कारण देऊन वरून पैसे आले नसल्याचे ग्राम विस्तार अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
१४,६०७ लाभार्थ्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
१४,१५४ पात्र लाभार्थी
९,२७५ घरे पूर्ण
४, ८१९ घरे आजही अपूर्णावस्थेत